साईनगर परसीरातील सांडपाण्याच्या दुर्गंधीने नागरीकांचे आरोग्य धोक्यात

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : कोपरगाव नगरपालीका हद्दीतील साईनगर परिसरामध्ये भर वस्तीत सांडपाणी साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर वसाहतीमधुन सांडपाणी वाहुन जाण्याकरीता ड्रेनेजची कोणतीही व्यवस्था नसल्याने परीसरातील सांडपाणी हे अध्यात्मीक ब्रम्हाकुमारी केंद्राचे पश्चिमेस रिकाम्या प्लॉटमध्ये सोडल्यामुळे अनेक दिवसांपासुन सांडपाणी साचुन मोठे डबके बनले आहे.

सांडपाण्याचे तलावात भटकी कुत्रे व डुकरे मुक्त विहार करतात, तसेच डासांचे साम्राज्य वाढल्यामुळे साईनगर परीसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असुन नागरीकांना दैनंदीन जिवन जगणे, घरात रहाणे मुश्कील झाले आहे. पावसाळयाच्या तोंडावर साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण झाले आहे. उच्चभ्रू वस्तीत अशी परिस्थिती असेल तर झोपडपट्टी भागाची काय अवस्था असेल याचा विचार न केलेला बरा.

सध्या नगरपालीकेत प्रशासकराज असल्यामुळे दखल घेणार कोण, हा प्रश्न मोठा आहे. साईनगर परीसरातील नागरीकांनी प्रशासक तथा मुख्याधिकारी, आमदार काळे साहेब, मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांना लेखी निवेदन देऊन लक्ष घालण्याची विनंती केली आहे. रहिवाशांच्या आरोग्याशी खेळू नये, असे साकडे परीसरातील नागरीकांनी नगरपालीकेला घातले आहे.