शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ : शेवगाव शहर नागरिक कृती समितीच्या हर्षदा काकडे यांनी शेवगाव शहराच्या गंभीर बनलेल्या पाणी प्रश्नासाठी दि. ३० रोजी शेवगाव नगरपरिषद परिसरात सहकुटुंब भोजन व्यवस्थेसह ‘मुक्काम ठोकून आंदोलन’ हाती घेतले. त्या आंदोलनात शेवगाव तालुका बार असोसिएशनचे सर्व सदस्य सहभागी होणार आहेत अशा आशयाचा ठराव बार असोसिएशनच्या वतीने घेण्यात आला असल्याचे प्रतिपादन शेवगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड.कारभारी गलांडे यांनी शेवगाव येथे केले.
शेवगाव बार असोसिएशन च्या सदस्यांच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जेष्ठ सदस्य अॅड.अर्जुनराव जाधव, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.आर.जी.बुधवंत, उपाध्यक्ष ॲड.व्ही.ए.भेरे, सचिव ॲड.एस. आर. देशमुख, यांचे सह सर्व सदस्य उपस्थितीत होते.
यावेळी काकडे म्हणाल्या की, शेवगाव बार असोसिएशनच्या पाठिंब्याने आपल्या आंदोलनाला हत्तीचे बळ मिळाले आहे. नवीन पाणीपुरवठा योजना काम जर वेळेत सुरू झाले असते तर आज नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली नसती. नवीन योजनेसाठी निधी मंजूर असून कार्यारंभ आदेशही देण्यात आलेला आहे. याला वर्ष होऊनही काम सुरु होत नसल्याने यामध्ये निश्चितच काहीतरी गौड बंगाल आहे व ते शोधण्याचे काम आता आपल्या सर्वांवर आहे.