मारहाण करुन दागिन्यासह दोन लाख ४८ हजाराचा ऐवज लुटला

शेवगाव प्रतिनिधी, दि. ८ : शेवगावात एकाच रात्री दोन ठिकाणी अज्ञात सहा चोरट्यांनी घराचे कडी-कोंडे तोडून घरातील व्यक्तींना मारहाण केल्याची, तसेच सोन्याचांदीचे दागिने, रोख रक्कम लंपास केल्याच्या घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडल्या आहेत. दोन्ही ठिकाणी सोन्या चांदीचे दागदागिने व रोख रक्कम मिळून एकूण दोन लाख ४८ हजार रुपयाचा ऐवज चोरीला गेला. रात्री उशीरा फिर्याद दाखल करण्यात आली. या घटनामुळे शहरात भितीचे वातावरण पसरले असून तात्काळ चोरट्यांचा बंदोबस्त करावा, पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

  या प्रकरणी दीपक बाबासाहेब जरांगे, ( वय ६५ रा. सासरवाडी हॉटेल समोर, मिरी रोड ) यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी मध्ये म्हटले आहे की, रात्री घरात झोपलेलो असताना, घराचा कडी कोंडा तोडून काळा शर्ट, काळी पँट घातलेल्या सहा जण घरात आले. यावेळी त्यांनी चाकूचा धाक दाखवत लाथा बुक्याने मारहाण करीत रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने काढून घेतले. तसेच त्यांना आत कोंडून टाकले. ओरडले तर आत येऊन जिवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेत चोरट्यांनी ६० हजार रोख रक्कमेसह सोन्याचांदीचे दागिने असे एकूण १ लाख ८ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याचे म्हटले आहे.
याच फिर्यादी मध्ये म्हटले की, शेजारील सातपुते वस्ती येथील निवृत्ती कारभारी वाणी यांच्या बंद घरातून रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने असे एकूण १ लाख ४० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरी केल्याचे फिर्यादी मध्ये म्हटले आहे.

श्वान पथक व ठसे तज्ञ पथकांनी पहाणी केली. श्वान पथकाने मिरीमार्गे नगर मार्गापर्यंत मार्ग दाखविला. तेथून चोरटे वाहनाने पसार झाले असावेत. एकाच रात्री दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीमुळे शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.