शेवगावात २८ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

शेवगाव प्रतिनिधी, दि. १० : येथील पद्मभूषण बाळासाहेब भारदे विद्यालयातील सन १९९५ ९६च्या दहावीचे विद्यार्थी “मैत्री – नातं रक्तापलिकडचं” ही संकल्पना घेऊन रविवार दिनांक ९ जून रोजी तब्बल २८ वर्षांनंतर एकत्र आले. आज विविध व्यवसायात नोकरी धंद्यात स्थिरावलेल्या अनेक प्रौढांनी एकत्र येत आपल्या जून्या आठवणीना उजाळा दिला.

सन  १९९५-९६ च्या दहावीच्या  बॅचच्या विद्यार्थ्यांनी  येथील साई – पूजा हॉलमध्ये स्नेहमेळाव्याचे रविवारी आयोजन केले होते. यावेळी एकत्र खाल्लेले डबे, हातावर खाल्लेल्या छड्या, मैदानावर खेळलेले खेळ, बोर्डाची परीक्षा, निकालाच्या दिवसाची धाकधूक, मन पिळवटून टाकणारा तो शाळेचा शेवटचा दिवस या आठवणीं स्मरत सर्वांनी आपली विद्यार्थीदशा जागविली. सोबतच वर्तमान आयुष्यावर बोलू काही म्हणूनही ख्याली-खुशालीच्या गप्पांच्या मैफिलीत सर्व माजी विद्यार्थी रमून गेले.

या  निमित्ताने अनेकांना दीर्घ कालावधी नंतर भेटल्यामुळे गहिवरून आले. यास्नेह मेळाव्याचे अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षक, ‘माझे विद्यार्थी आणि मी’ या पुस्तकाचे लेखक कचरू सारडा सर होते. एकनाथ शिरसाठ, रमेश पोरवाल, गोरक्ष बडे, मच्छिंद्र जाधव व राजश्री रसाळ हा गुरुजन वर्ग उपस्थित होता. माजी विद्यार्थ्याच्यावतीने  सर्व शिक्षकवृंदांचा सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. शिक्षक वृंदांनी माजी विद्यार्थी व सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस निरीक्षकपदावर कार्यरत असलेले मंगेश जगताप यांचा प्रातिनिधिक सत्कार केला.      

डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक, शासकीय सेवा, व्यावसायिक, पत्रकार, प्रगतिशील शेतकरी असलेले माजी विद्यार्थी वय, पद, प्रतिष्ठा, कामाचा व्याप बाजूला ठेवून अगदी उत्साहाने एकत्र आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. प्रदीर्घ कालखंडांनंतर भेटी-गाठी झाल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. मुख्य कार्यक्रमानंतर विविध स्पर्धा आयोजित करत यातील विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. कैलास देवढे यांनी सूत्रसंचलन केले, तर गणेश रांधवणे यांनी आभार मानले.