शेवगाव प्रतिनिधी, दि. ९ : तालुक्यातील गदेवाडी फाटा, खानापूर येथे एका युवकाकडे गावठी कट्टा तसेच जिवंत तीन काडतूसे मिळून आल्याने त्यास अटक करण्यात आली. शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या पथकाने रविवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली आहे. शेअर ट्रेडींगच्या नावाखाली अनेक नागरिकांच्या ठेवी गोळा करुन फरार झालेला हा युवक गावठी कट्ट्यामुळे पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला.
पोलीस नाईक बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अक्षय मेशोक इंगळे, रा. गदेवाडी याचे विरोधात, बेकायदेशीर रित्या अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुप्त बातमीदारामार्फत उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांना खानापूर येथील गदेवाडी फाट्यावर एक युवक उभा असून त्याच्याकडे गावठी कट्टा असल्याची खबर मिळाली होती.
त्यानुसार उपअधिक्षक पाटील यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे, आर. आर. अकोलकर, बाळासाहेब नागरगोजे यांचे पथक करून सूचना दिल्या. पथकाने दोन पंचाना सोबत घेऊन खानापूर गाठले. यावेळी इंगळे हा तिथे उभा असताना त्यास अंग झडतीचा उद्देश सांगून झडती घेतली असता, ३० हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्टल, तीन हजार रुपये किमतीचे, पिवळ्या रंगाचे तीन जिवंत काडतूसे मिळून आली.
संबंधित युवकास अटक करण्यात आली असून गावठी कट्टा, काडतूस जप्त करण्यात आली आहेत. सदर गावठी कट्टा कोणाकडून घेतला याबाबत उपयुक्त माहिती त्याने पोलिसांना दिली नाही. त्याने शेअर मार्केटच्या नावाखाली अनेकांच्या ठेवी गोळा करून काही महिन्यापासून अनेकांच्या पैशासह फरार होता. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शेवगाव पोलिसांकडे अनेक नागरिकांनी धाव घेतली होती. मात्र नागरिकांची फिर्याद घेण्यात आली नव्हती.
मात्र, बेकायदेशीर रित्या गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी तो पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला. शेअर मार्केट फसवणूक प्रकरणी पोलीस काय कारवाई करणार, याकडे नागरिकांचे आता लक्ष लागले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.