शेवगाव प्रतिनिधी, दि. १३ : शेवगाव ग्रामिण भाग असून देखील उत्तम आरोग्य सेवा देण्यात हा भाग अनेक दिवसापासून आघाडीवर राहिला आहे. तब्बल अर्धशतकापूर्वी येथे मिशनऱ्यांनी नित्य सेवा सारखे अद्ययावत रुग्णालय सुरू केले. त्यानंतर अनेक भूमिपुत्रांनी ही सामाजिक जाणिव जपत उच्चतम वैद्यकिय शिक्षण घेऊन देखील शेवगावातच आपली रुग्णालय सेवा सुरु केल्यामुळे वैद्यकिय मदतीसाठी आज शेवगाव समृद्ध बनले आहे. फुट ॲण्ड अँकल सर्जरी मध्ये अमेरीकेची फेलोशिप लाभलेले उच्च शिक्षित कन्सलटंट ऑथोपेडीक, आर्थोस्कोपी स्पाईन ॲण्ड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. विक्रांत घनवट पाटील हे त्यापैकी एक आहेत.
येथील घनवट आर्थोकेअरमध्ये डॉ. घनवट यांनी नुकतीच ७५ वर्षाच्या एका वृद्ध महिला रुग्णाच्या दोन्ही गुडघ्याची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली आहे. विशेष म्हणजे वृद्धेचा हेमोग्लोबिन अवघा ६ होता. रुग्ण महिलेला रक्त देऊन शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी वृध्देने वॉकरच्या सहाय्याने चालणे सुरु केले असून फिजीओथेरिपी द्वारे (व्यायाम उपचार ) त्या काही दिवसातच वॉकर शिवाय ताठपणे चालू शकणार आहेत. अनेकदा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया वा उपचारासाठी रुग्णांना मोठ्या शहरात जाणे भाग पडते मात्र ते सामान्य रुग्णांच्या आवाक्या बाहेरचे असते. शेवगावातील घनवट अर्थोकेअरमध्ये डॉ. घनवट यांनी वाजवी दरात हाडावरील विविध उपचार यशस्वी करून अशा रुग्णांना दिलासा दिला आहे.
तालुक्यातील हादगाव येथील द्वारकाबाई चौधरी या ७५ वर्षाच्या वृद्धा गुडघेदुखीने अत्यंत त्रस्त होत्या. डॉ. घनवट यांनी त्यांच्या दोन्ही गुडघ्यावर एकाच वेळी यशश्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. तीन तास शस्त्रक्रीया करून गुडघ्याचा वाकडेपणा सरळ केला. त्यासाठी दर्जेदार अशा धातूचा सांधा टाकला तसेच खाली पॉलिइथिलीनची उत्कृष्ठ गादी टाकण्यात आली. दुसऱ्याच दिवशी वॉकरवरच्या मदतीने त्या चालूही लागल्या. रुग्णालयातून घरी जातांना त्यांनी केक कापून घरच्या मंडळीसह रुग्णालयाच्या स्टाफ समवेत आपला आनंद साजरा केला.
यावेळी भूलतज्ञ डॉ. बाळासाहेब कोलते, शैलेश राख, साईनाथ भागवत, डॉ. चिंतामण जैन, डॉ. सुनील अकोलकर व नातेवाईक उपस्थित होते. मध्यंतरीच्या कोविड महामारीतील रुग्णांना खुब्याच्या सांधे दुखीने मोठया प्रमाणात पछाडले होते. या रुग्णांच्या हीप रिप्लेसमेंट सांधे बदलाच्या शस्त्रक्रीया ही येथे मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या आहेत.
हाडावरील व मणक्यावरील उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागत असल्याने रुग्ण व नातेवाईकांवर आर्थिक ताण पडतो. शेवगाव शहरात परवडणारे उपचार उपलब्ध करून दिल्याचे समाधान आहे. – डॉ. विक्रांत घनवट, अस्थिरोग तज्ञ