कोपरगाव प्रतिनिधी, दि.२५ : कोपरगाव शहरात गेल्या अनेक दिवासापासून मोटारी सायकल चोरीचे सत्र सुरु होते. नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार देवून वैतागले. मात्र चोरासह मोटार सायकलचा तपास लागत नव्हता. अखेर शहर पोलिसांनी अट्टल मोटार सायकल चोरासह तब्बल २५ मोटार सायकली जप्त करून चोरीच्या तपासातला विक्रम केला आहे. याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांनी अधिक माहिती दिली.
शहरामध्ये वारंवार मोटार सायकलीची चोरी होत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे श्रावण सखाराम वाघ रा. सोमठाणे जोश, ता. येवला जिल्हा नाशिक यांच्याकडे कोपरगाव येथून चोरीला गेलेल्या मोटार सायकली विक्रीस असल्याचे समजले. त्यावरून पोलीस निरीक्षक देशमुख यांनी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, पोलीस कर्मचारी गणेश काकडे, जालिंदर तमनर, महेश फड, श्रीकांत कुऱ्हाडे, अशोक शिंदे, दीपक रोकडे, बाळू धोंगडे, अर्जुन दारकुंडे यांचे पथक तयार करून श्रावण वाघ याला ताब्यात घेण्यासाठी गेले.
त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिली. अधिक विश्वासात घेतले असता त्याने कोपरगाव शहरातील इंदिरानगर भागात राहणारा कृष्णा प्रकाश शिंदे याने आपल्याकडे चोरून आणलेल्या दुचाकी विक्रीस दिल्याचे कबुली दिली. तो धागा पकडून पोलिसांनी कोपरगावचा अट्टल गुन्हेगार कृष्णा शिंदे याचा शोध सुरु केला असता तो अनेक वेळा चकवा देत होता. अखेर सिने स्टाईलने पोलिसांनी कृष्णा शिंदेला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता तो हि उडवाउडवीचे उत्तरे देत होता.
अखेर पोलीस खाक्या दाखवताच शिंदे याने श्रावण वाघ यांच्याकडे मोटार सायकली चोरून विकल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवत तब्बल २५ मोटार सायकली ताब्यात घेतल्या. त्यापैकी १६ मोटार सायकली ह्या कोपरगाव शहरातील असून त्यांच्या मालकांची ओळख पटली आहे. इतर गाड्यांची मालकांचा शोध घेत असून यासर्व गाड्यांची अंदाजे किमत १२ लाख 77 हजार रुपये आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी कृष्णा शिंदे हा अट्टल गुन्हेगार असून त्याने यापूर्वी देखील घरफोडी, मंगळसूत्र ओढणे सारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला यापूर्वी वेगवेगळ्या गुन्ह्यात आठ वर्षे सजा भोगावी लागली होती. तो नुकताच बाहेर आला होता. त्याने पुन्ह आपले काळे कारनामे सुरु करत २५ मोटार सायकली काही महिन्यात चोरल्या.
आणखी किती मोटार सायकली चोरल्या याचा पोलीस तपास करीत आहेत. आरोपी शिंदे याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत सुनावली असून पोलीस त्याच्याकडून इतर चोऱ्याचा तपास करत आहे. अवघ्या तीन दिवसात पोलिसांनी १२ लाख ७६ हजारांच्या २५ मोटार सायकलीसह अट्टल दोन गुन्हेगार पकडण्यात यश मिळवले. त्यांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.