शेअर मार्केट फसवणूक प्रकरणी आमदार राजळेंचे फडणवीसांना निवेदन

शेवगाव प्रतिनिधी, दि. ६ : मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार मोनिका राजळे यांनी,  मतदारसंघातील विविध प्रश्नांसह शेअर ट्रेडिंग फसवणूक प्रकरणात, एसआयटी मार्फत चौकशी होऊन, संबंधितांना अटक करावी, अशी मागणी केली आहे. यावेळी शेवगाव येथून गेलेल्या शिष्टमंडळासह  गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करुन गुंतवणूकदारांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
  आमदार मोनिका राजळे यांनी सभागृहात बोलताना, शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील कष्टकरी, शेतकरी, यांच्यासह अनेकांना चुकीच्या पद्धतीने जास्तीचा परताव्याचे आमिष दाखवून, शेअर मार्केट ट्रेडिंग करणाऱ्या एजंटांनी मोठी लुबाडणूक केली आहे. एक ते दीड हजार कोटींचा गोधळ असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यास सुरुवात झाली.

हा घोटाळा मोठा असल्याने याबाबत एसआयटी नेमून चौकशी करुन, आरोपींना अटक करावी. अनेकांनी पतसंस्था काढून, गृह कर्ज घेऊन, महिलांनी दागदागिने मोडून गुंतवणूक केली आहे. ते पैसे कसे परत मिळतील हे पहायला हवे. तसेच शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौरपंपाची योजना अधिक कार्यक्षमतेने सर्वांच्या पर्यंत कशी पोहचेल, त्याचा लाभ कसा होईल, याचे विशेष प्रयत्न शासनामार्फत व्हावेत. अशी आग्रही मागणी केली.

एक रुपया पीक विमा योजनेअंतर्गत शेवगाव तालुक्यातील ४७ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. मात्र त्याचा लाभ ५ हजार शेतकऱ्यांना झाला. विमा कंपन्यांनी काही कारणं सांगून त्यांना न्याय दिला नाही. त्यांच्या अडचणी सोडवल्या नाहीत. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा. जायकवाडी बुडीत क्षेत्रातील २० गावांना भौतिक सुविधा देण्यासाठी, प्रस्ताव दाखल केला आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा.

शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आहे, जुन्या बसेसची अतिशय दयनीय अवस्था आहे. त्या रस्त्यात कुठेही  बंद पडतात. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी नव्याने ३० बसेस देण्यात याव्यात. प्रादेशिक पाणी पुरवठा योजना वीज बिल न भरल्याने बंद पडत आहेत. थकीत वीज बिलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कायमस्वरूपी कालबद्ध धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा. अशाही मागण्या यावेळी करण्यात आल्या.

परिसरातील शेतकऱ्यांचे पंधरा ते वीस हजार गुंतवणूकदारांची सुमारे दोन हजार कोटी रुपयांची फसवणूक करून ट्रेडिंग कंपन्या व ऑफिस बंद करुन एजंट फरार झाले आहेत. याबाबत एसआयटी मार्फत चौकशी होऊन कारवाई व्हावी. या मागणीसाठी आमदार मोनिका राजळे यांच्या समवेत ग्रहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेल्या शिष्ट मंडळात तालुक्यातील  चापडगावचे उपसरपंच सुरेश नेमाने, फकिरभाई शेख, विष्णूपंत पातकळ, संजय सुधाकर जोशी, सुभाष जनार्धन आंधळे, राजू धोंडीराम दोरखे, मनोहर कातकडे, प्रभाकर झुंबड, धनंजय जाधव यांचा समावेश होता.        यावेळी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस यांनी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सुचना संबधीतांना दिल्या असल्याचे शिष्टमंडळाने येथे सांगितले.