साखर सम्राटांच्या विरोधात चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढवावी कार्यकर्त्यांची  मागणी

शेवगाव प्रतिनिधी, दि. ८ :  वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून  प्रस्थापित साखर सम्राटाच्या विरोधात निवडणूक लढवावी अशी जोरदार मागणी शेवगाव तालुक्यातील वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी  केली आहे.

येथील ममता लॉन्समध्ये आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या निर्धार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस महिला तालुकाध्यक्ष संगीता ढवळे, अरुण झांबरे, सुरेश खंडागळे, सागर गरुड, विशाल इंगळे, ज्ञानेश्वर म्हस्के, अन्सार कुरेशी, राजू पठाण, अंकुश कडमिंचे,  सुनील साळवे, रोहिनी ताई ठोबे, चंदा खंडागळे, बाळासाहेब लहासे, अरुण खर्चन, कल्याण भागवत, संतोष ढाकणे, प्रमोद कांबळे आदी  पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.

  यावेळी प्रा.  चव्हाण ही आमची पावर बँक आहे. शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील गोरगरीब, कष्टकरी,दलित, मुस्लिम, आदिवासी, भटके विमुक्त, गरीब मराठा, ओबीसी समाजाचे विविध प्रश्न प्रामुख्याने हाती घेऊन ते सतत जनतेसाठी रस्त्यावरची लढाई करतात. गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढली पाहिजे. असा आग्रह अनेक कार्यकर्त्यांनी केला.

 शेवगाव – पाथर्डी मतदार संघातील साखर सम्राटांची सुरू असलेली मक्तेदारी मोडीत काढून ही निवडणूक आपण मोठ्या ताकदीने लढवली पाहिजे. कारण प्रस्थापित पुढारी, कारखानदार व शिक्षण सम्राट यांना गोरगरिबांच्या प्रश्नांची कुठलीही जाण नाही. गेली अनेक वर्षे  चव्हाण यांनी घोंगडी बैठकीच्या माध्यमातून गावोगाव जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेऊन ते सातत्याने सोडवले आहेत. प्रा. चव्हाण यांना जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेत पाठविण्यासाठी सर्व ताकदीनिशी तन, मन, धनाने त्यांच्या पाठीशी उभे राहू अशी प्रतिज्ञाही कार्यकर्त्यांनी केली.  वंचितचे तालुकाअध्यक्ष प्यारेलाल  शेख यांनी प्रास्ताविक केले. गणेश साळवे यांनी सूत्रसंचालन केले. तर भारत मिसाळ यांनी आभार मानले.