जनतेला विचारून विकास कामे करणारे राज्यातील पहिले आमदार काळे

आ. आशुतोष काळेंनी ५ नं. तलावासाठी मंत्रीपद नाकारले कोपरगावकरांच्या प्रतिक्रिया

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : जनतेने टाकलेल्या विश्वासातून चार वर्षात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून केलेल्या विकासाच्या बाबतीत कोपरगावकर समाधानी आहे का? व कोपरगावकरांच्या विकासाच्या बाबतीत अजून काय काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी ‘संवाद कोपरगावच्या विकासाचा’ या अभिनव उपक्रमाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगू लागली असून जनतेला विचारून विकास कामे करणारा पहिला आमदार राज्यातील जनतेला आ. आशुतोष काळे यांच्या रूपाने पाहिला मिळाला आहे.

आ. आशुतोष काळे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मतदार संघाचा अनुशेष भरून काढण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नियमितपणे जनता दरबार सुरु केला होता. त्या माध्यमातून विकासकामांना गती मिळून नागरिकांचे प्रश्न देखील सुटू लागले होते. परंतु दोन वर्ष वैश्विक कोरोना महामारीमुळे सार्वजनिक कार्यक्रमांना कायदेशीर बंदी होती. त्यामुळे जरी जनता दरबार होवू शकले नाही. मात्र आ. आशुतोष काळे यांचा निधी मिळविण्याचा सपाटा सुरूच होता. त्यामुळे चार वर्षात त्यांनी कोपरगाव शहरासह मतदार संघाच्या विकासासाठी २३०० कोटीचा निधी आणून मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलवून कोपरगाव शहराची धुळगाव ओळख पुसण्यात ते यशस्वी झाले आहे.

काय म्हणाले कोपरगावकर…..

आ. आशुतोष काळे यांना मंत्रीपद चालून आले होते. मात्र त्यांना मंत्रीपदापेक्षा ५ नंबर साठवण तलाव महत्वाचा वाटला. त्यामुळे त्यांनी मंत्रिपदाला स्पष्टपणे नकार देवून ५ नंबर साठवण तलावाला दिलेले प्राधान्य कौतुकास्पद आहे. हे राज्यातील पहिले आमदार आहेत जे नागरिकांना बोलून देतात, त्यांचे म्हणणे ऐकून घेतात. विकासाच्या प्रश्नावर त्यांनी कोपरगावकरांना बोलते केले आहे. विकासावर बोलण्यासाठी त्यांनी खुले व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून विकासाचे व्हिजन असलेला तरून, तडफदार लोकप्रतिनिधी आ. आशुतोष काळे यांच्या रूपाने कोपरगाव मतदार संघाला लाभला आहे. आ. आशुतोष काळे यांचे वय कमी असताना त्यांनी कमी वेळात खूप मोठे काम केले आहे. त्यांनी मिळविलेल्या एवढ्या मोठ्या निधीचा सदुपयोग होऊन त्या कामाची पावती आ. आशुतोष काळे यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही अशा भावना नागरिकांनी यावेळी व्यक्त केल्या.

त्याचबरोबर कोपरगाव शहराचा अत्यंत जिव्हाळ्याचा मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील त्यांनी मार्गी लावला आहे. त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातील नागरिकांच्या मनात विकासाच्या असलेल्या अधिकच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी कोपरगाव येथील कृष्णाई मंगल कार्यालयात ‘संवाद कोपरगावच्या विकासाचा’ या वैशिष्टपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून कोपरगावकरांना  मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या कार्यक्रमाला शहरातील नागरिकांचा उस्त्फुर्त प्रतिसाद मिळाला असून नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांच्या या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक करून जनतेचे ऐकणारा आमदार कोपरगावला मिळाला असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांच्या संवादातून यावेळी उमटल्या.

यावेळी आ. आशुतोष काळे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, कोपरगाव शहराचा जिव्हाळ्याचा असलेला पाणीप्रश्न लवकरच सुटणार असून नागरिकांना नियमित व स्वच्छ पाणी मिळणार आहे. नागरिकांच्या अपेक्षा विचारात घेवून  कोपरगावकरांना दिलेल्या सर्व आश्वासनाची पूर्तता करण्याचा प्रयत्न करत आहे. जनतेचा पाठिंबा, आशीर्वाद असल्यामुळे शहरांमध्ये सर्व रस्त्यांचे रुपडे बदलवून धुळगाव ओळख पुसण्यात यशस्वी झालो.

शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी पाच नंबर साठवण तलाव, वितरण व्यवस्था, पाण्याच्या टाक्या, सर्व प्रमुख रस्ते, हद्दवाढ भागातील रस्ते, भूमिगत गटारी, स्मशानभूमी, कब्रस्तान, सामाजिक सभागृह, व्यापारी संकुल, नगरपालिका प्रशासकीय इमारत व प्रशासकीय फर्निचर, उद्यान सुशोभिकरण, छोटे पूल अशा विविध विकास कामांना ३०० कोटी निधी दिला आहे.

प्रास्ताविक कामांमध्ये क्रीडा संकुल, भूमिगत गटारी, एसटीपी प्लांट, भूमिगत गटारी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण रस्त्यांच काँक्रिटीकरण, डांबरीकरण करून उच्च दर्जाचे रस्ते, नगरपालिका कर्मचाऱ्यांची वसाहत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नाट्यगृह, नदी संवर्धन, गोदावरी नदी घाट सुशोभीकरण, बाजारतळ काँक्रिटीकरण अशी विविध विकास कामे पूर्ण होणार आहे.

कोपरगाव तालुक्यातून जात असलेला समृद्धी महामार्ग त्याचबरोबर अनेक राष्ट्रीय महामार्ग, विमानतळ, रेल्वे स्टेशन अशा दळणवळणाच्या सर्व सोयी सुविधांच्या माध्यमातून व चार वर्षात मतदार संघात झालेल्या विकासातून कोपरगाव मतदार संघाला जिल्ह्यात नंबर एकवर घेवून जाण्यासाठी नागरिकांचा देखील सहभाग असावा यासाठी ‘संवाद कोपरगावच्या विकासाचा’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी बिनदिक्कतपणे कोपरगाव शहराच्या विकासाच्या बाबतीत आपल्या मनातील भावना व्यक्त करून शहर विकासाच्या बाबतीत सर्वसामान्य नागरिकांना बोलण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले.

यावेळी कोपरगाव शहरातील व्यापारी, महिला, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, नोकरदार व सामान्य नागरिकांनी कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या मनात असलेल्या संकल्पना व सुचना आ. आशुतोष काळे यांच्यापुढे मांडल्या यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.