शेवगावमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने लाडकी बहीण योजना शिबीराचे आयोजन

शेवगाव प्रतिनिधी, दि. ९ : राज्याचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि या विभागाच्या मंत्री आणि आदिती तटकरे आणि राज्य शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ” मुख्यमंत्री लाडकी बहीण ” योजनेला संपूर्ण राज्यात व शेवगावात मोठा  उत्स्कूर्त प्रतिसाद मिळतो आहे.

शेवगावात युवा सेनेचे जिल्हा अध्यक्ष साईनाथ आधाट, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष आशुतोष डहाळे यांनी त्यांच्या सहकाऱ्याना बरोबर घेऊन ” लाडक्या ” बहिणीचे शिबीर आयोजित करून त्यांचे  फॉर्म स्वतः व कार्यकर्त्या मार्फत भरून देण्याचा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविला असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिका ताई राजळे यांनी केले.

येथील श्रीनाथ मंगल कार्यालयात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची माहिती  देऊन फॉर्म भरून घेण्यासाठी आयोजित केलेल्या बहिणींच्या शिबिरात त्या बोलत होत्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे , नगर शहर प्रमुख सचिन जाधव, शिबीर आयोजक युवा सेना जिल्हा प्रमुख  साईनाथ आधाट, शिवसेना तालुकाप्रमुख आशुतोष डहाळे, उमेश भालसिंग मंचावर होते.

       यावेळी आ. राजळे म्हणाल्या, या योजने साठी प्रारंभी २० ते ६० वयोमर्यादा व पाच एकर क्षेत्राचे बंधन होते. तर अर्ज दाखल करण्यास एक ते पंधरा जुलै पर्यंतच मुदत  होती. मात्र सध्या अधिवेशनाचा काळ असल्याने तसेच आपले आराध्य दैवत पांडुरंगाची आषाढी वारी सुरू असल्याने आपल्या बहिणी लाखोच्या संख्येने या वारीसाठी जात असल्याने फॉर्म भरण्यात अडचण येऊ शकते. म्हणून आम्ही आमदारांनी ही बाब मुख्य मंत्र्याच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी वयोमर्यादा ६५ पर्यंत करून धारण क्षेत्राची अट काढून टाकली.

त्याचबरोबर अर्जासाठी  ३० ऑगस्टपर्यंत मुदत वाढविली आहे. तसेच योजनेचा लाभ मात्र जुलैपासून देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. दीड हजार रुपये अनुदानाचा कुटुंबाला चांगला आधार मिळणार आहे. या अगोदरही महिलांना एसटी भाड्यात ५० टक्के सवलत,अशा अनेक लाभदायी योजना  महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री यांनी दिल्या आहेत.

यावेळी शिवसेना नगरशहर प्रमुख सचिन जाधव यांचेही भाषण झाले. प्रसाद डाके, विशाल परदेशी, दादा कसाळ, अमर जाधव, संदीप लांडगे, प्रभाकर गायकवाड, विकास भागवत यांनी शिबीराच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले साईनाथ आघाट यांनी प्रास्ताविक केले तर डहाळे यांनी आभार मानले.

युवा सेना जिल्हाप्रमुख  साईनाथ आघाट व शिवसेना तालुकाप्रमुख डहाळे यांनी दिवसभर शिबिर स्थळी थांबून तब्बल अठराशे फॉर्म भरून घेतले. आडाणी महिला भगिनी कडून कागदपत्राची स्वतः लक्ष घालून  पूर्तता करून घेतली.