शेवगाव प्रतिनिधी, दि. ९ : शेवगाव पाथर्डी परिसरात घरफोडी करणारी टोळी साडेसहा लाखावर रुपये किमतीच्या ९४.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिण्यासह नगर स्थानिक गुन्हे शाखेने शेवगावातून काल सोमवारी जेरबंद केली असून या वेळी पथकाने एकूण १० गुन्हे आणले उघडकीस आणले आहेत.
तालुक्यातील पिंगेवाडीच्या महादेव मुरलीधर मुंढे गेल्या ४ तारखेला सकाळी त्यांचे घराचा दरवाजा बंद करुन शेतामध्ये शेतकामासाठी गेले असता कोणीतरी अनोळखी आरोपींनी त्यांचे घराचे कुलुप तोडून पत्र्याचे पेटीमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण एक लाख ९२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता. तशी फिर्याद शेवगाव पोलिसात दाखल करण्यात आली होती.
पोलिस अधिक्षक ओला याचे सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, रविंद्र कर्डीले, संतोष लोढे, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, संतोष खैरे, अमृत आढाव, फुरकान शेख, प्रशांत राठोड, संभाजी कोतकर यांचे पथक तयार करुन मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणेकामी पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते. या पथकाने जिल्ह्यामधील घरफोडीचे गुन्ह्यातील निष्पन्न झालेल्या आरोपींची माहिती घेतली.
त्यानुसार काल सोमवारी (दि ८) हा गुन्हा करणाऱ्या लखन विजय काळे (वय २२, रा. शेवगांव) गोरख हैनात भोसले (वय २४, रा. घोसपुरी, ता. जि. अहमदनगर, व सोनाजी एकनाथ गर्जे, ( वय ५२ रा. गर्जेवस्ती, गेवराई रोड, शेवगांव ) या तिघांना ताब्यात घेतले. सोनाजी एकनाथ गर्जे याचे कब्जामध्ये सहा लाख ६३ हजार ५०० रुपये किमतीचे ९४.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मिळुन आले.
सदर सोन्याचे दागिने व रोख रकमेबाबत त्याचेकडे विचारपुस करता त्याने सदरचे दागिने हे लखन विजय काळे व गोरख हैनात भोसले यांनी त्याचेकडे विकण्यासाठी दिले असल्याचे सांगितले. सखोल चौकशी करता त्यांनी निवडुंगे, शिरसाठवाडी व जोगेवाडी, ता. पाथर्डी, चांदगांव व पिंगेवाडी, ता. शेवगांव तसेच शेवगांव शहरातुन घरफोडी चोरी करुन आणल्याचे सांगितले.
या आरोपींकडुन पाथर्डी शेवगाव एकुण ६ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. लखन काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचेविरुध्द अहमदनगर जिल्ह्यामध्ये दरोडा, घरफोडी व चोरीचे चार गुन्हे दाखल आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस पुढील तपासकामी शेवगांव पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले असुन पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे. सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग शेवगांव यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.