ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान

 कोपरगांव प्रतिनिधी, दि. १० : गोदावरी डाव्या कालव्याजवळील ब्राम्हणगांव येसगांव रोड नुतणीकरण करतांना गट नंबर ३६२ लगत पावसाचे मोठ्या प्रमाणांत पाणी साठले जाते त्यासाठी कोपरगांव सार्वजनिक बांधकाम उपविभाग त्यांचे अधिकारी, संबंधीत ठेकेदार सतत पाहणी करून जातात पण गेल्या सात वर्षापासुन नळया टाकल्या नाही परिणामी शेतातील पिकाचे नुकसान झाले अशी तक्रार सुभाष शामराव गाडे व अन्य शेतक-यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे केली असुन मंगळवार ९ जुलै रोजी सायंकाळी अचानक १०५ मिलीमिटर पाउस झाल्यांने कपाशीसह अन्य पिकांत गुडघाभर पाणी साचले आहे. 

            याबाबतची माहिती अशी की, ब्राम्हणगांव परिसरातील सर्वश्री सुभाष शामराव गाडे, पुंडलिक शामराव गाडे, बाळासाहेब एकनाथ हुळेकर, नामदेव आण्णासाहेब बु-हाडे, योगेश पंढरीनाथ नागरे आदि शेतक-यांच्या जमिनी असुन रस्त्याचे काम करतांना संबंधीत ठेकेदाराने जुन्या नळ्या काढुन टाकल्या त्यामुळे पावसासह अन्य पाणी जाण्यांस मार्ग उरला नाही, सन २०१८ पासुन ते आजपर्यंत सलग सात वर्ष पावसाची नैसर्गीक आपत्ती या शेतक-यांना सतत सहन करावी लागत आहे.

संबंधीत शेतक-यांनी अधिका-यांसह लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रारी केल्या, सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोपरगांवच्या अधिका-यांनी पाहणीही केली. दोन नळ्या, सिमेंट टाकण्यांत आल्या पण ठेकेदारास बील न दिल्यांने त्याने त्या उचलुन नेल्या याबाबत लेखी तक्रारी देवुनही अधिकारी डोळेझाक करत आहे, या घटनेस सात वर्षे झाले पण प्रशासन या शेतक-यांची दखल घ्यायला तयार नाही., तहसिलदारांनाही त्याची खंत नाही.

नव्याने रस्ता करतांना संबंधीत ठेकेदारांने या शेतक-यांचे नुकसान केलेले आहे तेंव्हा त्यांच्यासह यातील सर्व जबाबदार अधिका-यावर नुकसान भरपाई मिळण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यांस शेतक-यांनी तयारी केली आहे. करू पाहु होईल असे सरकारी साचेबध्द उत्तरे मिळत असल्यांने शेतकरी हताश होवुन आता तक्रार तरी कुठे करायची म्हणून शोधमोहिम करत आहेत.

वरूणराजा कुणांच्याही हातचा नाही. मंगळवारी ९ जुलै रोजी सायंकाळी अचानक १०५ मिलीमिटर पाउस झाल्यांने सुभाष गाडे या शेतक-याचे संपुर्ण कपाशीचे पिक तर अन्य शेतक-यांचे सोयाबीन मका आदि पीके पाण्यात आहे त्याची नुकसान भरपाई मिळावी अशी या शेतक-यांची मागणी आहे.