वृक्षवेध फाउंडेशनची १३७१ वृक्षारोपण व संवर्धनाची शपथ

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : तालुक्यातील अंजनापूर येथे वृक्षवेध फाउंडेशन, कोपरगाव यांच्या वतीने आणि स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या सहकार्याने ‘प्रकृती वंदन : १३७१ आशीर्वाद वृक्षारोपण आणि संवर्धन शपथ कार्यक्रम’ अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला. पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पर्यावरणवादी कार्यकर्ते पद्मश्री शामसुंदर पालीवाल तसेच पद्मश्री व रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त समाजसेविका नीलिमा मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निसर्गपूरक कार्यक्रम तसेच १३७१ वृक्षांची लागवड करण्यात आली.

 विशेष म्हणजे यापूर्वी गेल्या नऊ वर्षापासून दरवर्षी असाच कार्यक्रम या गावात दरवर्षी घेण्यात येत आहे. आजपर्यंत एकूण १५०१३ वृक्षांची लागवड करून त्यांचे यशस्वी संवर्धन करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता सर्वदूर अंजनापूरची ‘पर्यावरणतीर्थ’ अशी ओळख तयार झालेली आहे. उपक्रमामध्ये वृक्षवेध फाउंडेशन सोबतच अंजनापूर येथील प्रदिप गव्हाणे, ज्ञानेश्वर गव्हाणे, बी.सी. गव्हाणे, नंदू पाडेकर व संतोष गव्हाणे तसेच समस्त ग्रामस्थ, के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, प्राचार्य, व्यवस्थापन आणि कार्यक्रमाधिकारी तसेच अनेक आजी-माजी स्वयंसेवकांचे योगदान देखील अत्यंत महत्त्वाचे आहे, किंबहुना त्यांच्या प्रयत्नामुळेच आज अंजनापूर मध्ये १५००० वृक्ष दिमाखात उभे आहेत. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात नमूद केले.

कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव अॅड्. संजीव कुलकर्णी तसेच विश्वस्त मा. संदीपराव रोहमारे, प्र. प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले यांनी यानिमित्त वृक्षवेध फाउंडेशन तसेच महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांचे आणि अधिकाऱ्याचे कौतुक केले. तसेच त्यांच्या आगामी उपक्रमांसाठी भरघोस शुभेच्छा दिल्या आहेत.