शेवगाव प्रतिनिधी, दि. ११ : शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या कार्यपध्दतीमुळे तालुक्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. शेवगाव पोलीस ठाण्यात कोणत्या ही कामासाठी चिरीमिरी घेतल्याशिवाय काम होत नाही. तसेच पोलीस निरीक्षक नेहमी मनमानी कामकाज करतात. पोलीस निरीक्षक भदाणे याच्या अशा कामकाजाची चौकशी करुन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन शेवगाव तालुका वकील संघाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांना देण्यात आले असून कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यामध्ये सर्वत्र अवैध धंदयाचा सुळसुळात झाला आहे. तसेच दिवसा ढवळया चोरींच्या घटनांमध्ये मोठया वाढ झाली आहे. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. या प्रकरणांवर पोलीस प्रशासनाचा अंकुश राहीलेला नसुन पोलीस ठाण्यात दलालांचा सुळसुळाट झाला आहे.
तालुक्यातील अवैध धंदयामध्ये पोलीसांचे अभय असल्याने हे व्यवसाय राजरोजपणे सुरु आहेत. तसेच पक्षकारांच्या कामकाजानिमीत्त पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलीस अधिकारी वकील मंडळींना चांगली वागणुक देत नाहीत. उध्दट भाषा वापरुन वकीलांचा अपमान करतात. तसेच अनेक प्रकरणात चिरीमिरी घेतल्याशिवाय कामे मार्गी लागत नाहीत. याबाबत आपण लक्ष घालून पोलीस निरीक्षक भदाणे यांची चौकशी करुन कारवाई करावी. अशी मागणी वकील संघाच्या वतीने करणात आली असून कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ही देण्यात आला आहे.
निवेदनावर शेवगाव तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. रामदास बुधवंत, सचिव ॲड. संभाजी देशमुख, उपाध्यक्ष ॲड. विजय भेरे, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. अर्जुन जाधव, माजी अध्यक्ष ॲड. कारभारी गलांडे, ॲड. मनोहर थोरात, ॲड. शिवाजी भोसले, ॲड. अमोल वेलदे, ॲड. अभय कराड, ॲड. जयप्रकाश देशमुख, ॲड. ए.बी.शिंदे,ॲड. किरण अंधारे, ॲड. महेश आमले, ॲड. नामदेव गरड ॲड. रविंद्र सकट आदींसह पदाधिका-यांच्या सहया आहेत.