वाघोली ग्रामपंचायतला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

शेवगाव प्रतिनिधी, दि. १९ : माझी वसुंधरा अभियानान्तर्गत केलेल्या आदर्श कामामुळे प्रकाश झोतात आलेल्या आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळाकडे वाटचाल करत असलेल्या तालुक्यातील वाघोलीने सलग दोन वर्षे राज्य स्तरीय दिड कोटी रुपयाचे प्रथम पारितोषिक मिळवून उच्चांक केला. वसुंधरेवर प्रेम करणाऱ्या वाघोली ग्रामपंचायतला या वर्षीचा महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ मुंबई यांचा पर्यावरण व जलसंधारण मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दलचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.

बीकेसी वांद्रे मुंबई येथे नॅशनल स्टॉक एक्सचेंज वेण्यू पार्टनर व महाराष्ट्र राज्य अंबा उत्पादक संघ यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये तीर्थकार पटनाई मुख्य अर्थतज्ञ भारतीय राष्ट्रीय शेअर बाजार, सुबिर दास कार्यकारी संचालक इसीजीसी भारत सरकार, डॉ. अजयकुमार सूद उपव्यवस्थापकीय संचालक नाबार्ड, चंद्रकांत मोकळ अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ व मान्यवरांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आदर्श वाघोलीचे  प्रणेते उमेश भालसिंग, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जमधडे, भाऊराव भालसिंग, किशोर शेळके, यांनी वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार स्वीकारताना मनस्वी आनंद होत आहे गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे नवीन काम करण्यास प्रेरणा मिळते, अशी भावना उमेश भालसिंग यांनी यावेळी व्यक्त करून हा पुरस्कार वाघोली गावातील नवयुवक, माता-भगिनी ज्येष्ठ मंडळी यांना समर्पित केला.