दीड कोटीची फसवणूक शेवगावात गुन्हा दाखल

शेवगाव प्रतिनिधी, दि . २२ : तालूक्यातील लाडजळगाव येथील एका एजंटा ने शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले असून त्याचे विरोधात, सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी, शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.                

 प्रवीण विक्रम बुधवंत ( रा. शेवगाव ) यांनी एजंट वैभव ज्ञानेश्वर कोकाटे याच्या विरोधात ही फिर्याद दिली आहे . या फिर्यादी मध्ये म्हटले की,  वैभव कोकाटे याने, व्ही.के. ट्रेडिंग सोल्युशन नावाने शेअर मार्केट ट्रेडिंग व्यवसाय सुरु केल्याचे, तसेच एक लाख दिले तर प्रती महिना १० टक्के प्रमाणे परतावा देत असल्याचे बुधवंत यांना सांगितले. त्याच्या अमिषाला बळी पडून बुधवंत व त्यांच्या ओळखीच्या लोकांनी, वेळोवेळी आरटीजीएस व रोख स्वरुपात पैसे ट्रान्सफर केले. दरम्यान गुंतवणूक केलेली मूळ रक्कम, परतावा देण्यास टाळाटाळ करुन कोकाटे पळून गेला आहे.

  बुधवंत यांची ९५ लाख ५६ हजार, तर प्रभाकर पंडित खेडकर रा. राणेगाव २ लाख, पंडित गेनू खेडकर रा.राणेगाव १ लाख, राजेंद्र अंबादास पालवे रा. राणेगाव ४ लाख,  एकनाथ आसाराम भुसारे रा. बोधेगाव ९ लाख ५ हजार, दिलीप अंबादास गायकवाड रा. बोधेगाव १८ लाख, अशोक भाऊसाहेब तहकिक रा. लाडजळगाव १० लाख, नवनाथ धर्मराज चेमटे रा. शिंगोरी १ लाख, मनोहर आबासाहेब घोरपडे रा. बोधेगाव १ लाख,  किरण देविदास तहाकिक रा. लाडजळगाव ६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करुन पळून गेला आहे.                 

तसेच १६ जुलै रोजी तेजस काकासाहेब तानवडे, रा. पिंगेवडी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरुन कानिफनाथ अशोक काजळे रा. सोनविहीर, याचे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काजळे याने मोहटादेवी ट्रेडिंग कंपनी या नावाने कार्यालय सुरु करुन परिसरातील नागरिकांना १६ टक्के प्रती महिना परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

काजळे याच्यावर विश्वास ठेऊन रानडे यांनी ११ लाख रुपये रोख दिले होते. दिड महिन्यात परतावा म्हणून २ लाख रुपये तानवडे यांना परत दिले. त्यानंतर त्याने परतावा व मूळ रक्कम देण्यास टाळाटाळ केली. गावातील किरण बबन वाघ १० लाख, तेजस काकासाहेब तानवडे ११ लाख, उद्धव शहादेव वाघ ३ लाख, तुकाराम भाऊसाहेब तानवडे १३ लाख, ज्ञानेश्वर सुभाष मुंढे ८ लाख, कैलास गोरक्ष घुले ३ लाख, नंदु साहेबराव अकोलकर ५० हजार, आप्पासाहेब रामभाऊ अकोलकर ७५ हजार रुपये अशी एकूण ४९ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादी मध्ये म्हटले आहे.  

          दरम्यान शेवगाव पोलिसांकडून फसवणूक झालेल्या लोकांच्या अर्जावर पडताळणी करुन संबंधितांवर गुन्हे दाखल होत आहेत. तथापि पळून गेलेले  शेअर मार्केट एजंटांचा ठाव ठिकाना अज्ञात असल्याने पोलिसासमोर त्यांना शोधण्याचे आव्हान असून फरार एजंटांचा पोलीस शोध घेत आहेत.