शेवगाव प्रतिनिधी, दि . ३० : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांचे जीवन चरित्र सर्वांना स्फूर्ती व प्रेरणा देणारे आहे. आजच्या युवकांनी प्रभू रामचंद्रांच्या जीवनापासून प्रेरणा घेवून मर्यादेत जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर आपले जीवन सार्थकी लागणार असल्याचे प्रतिपादन ह भ प विक्रम महाराज अवचिते यांनी केले.
श्रीराम नवमी उत्सवाच्या निमित्ताने येथील सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने शेवगावातील आखेगाव रस्त्यावरील स्वराज्य मंगल कार्यालयापासून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. यावेळी जय श्रीरामाच्या उदघोषाने परिसर दणाणून गेला. भव्य रथात प्रभू श्री रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण, हनुमान यांच्या मूर्तीसह मिरवणुकीत सहभागी झालेल्या शहीद भगतसिंग सार्वजनिक मंडळाच्या ढोल ताशा पथकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
बाल टाळकरी, विविध सार्वजनिक मंडळाच्या लेझीम पथकासह रामभक्तांची मोठी उपस्थिती होती. मिरवणुकीवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, क्रांती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने शोभा यात्रा बाजार पेठेतील श्रीराम मंदिराच्या परिसरात आल्यानंतर त्याठिकाणी राम जन्मोत्सव व महाआरती करण्यात आली.
तसेच शहरातील साईनगरातील साईबाबा मंदिरात श्री साई समितीच्या वतीने पार पडलेला श्री साई रामनवमी उत्सवात गोविद महाराज जाटदेवळेकर यांचे हरीकीर्तन झाले. सकाळी महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत पार पडला. संध्याकाळी आयोजित महाप्रसादाचा शहर व परिसरातील हजारो भाविकांनी लाभ घेतला.
तर मारवाड गल्लीतील बालाजी मंदिरात माहेश्वरी समाजाच्या वतीने रामनवमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माहेश्वरी समाज तसेच माहेश्वरी महिला मंडळ, बहु मंडळ, युवती मंडळाच्या पदाधिकारी सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.