शेवगाव प्रतिनिधी, दि. २३ : कृषी विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे शेवगाव तालुक्यामध्ये ४० हजार शेतकरी पिक विमा भरूनही विमा रकमेपासून वंचित राहिलेले आहेत. म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा मिळावा या मागणीसाठी शेवगाव कृषी अधिकारी कार्यालयावर आज जि.प.सदस्या हर्षदा काकडे यांचे नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.
तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांनी पावसाची बुरबुर असतांनाही आंदोलनांमध्ये सहभागी होऊन लोकप्रतिनिधी व शासनावर रोष व्यक्त केला. यावेळी ॲड. शिवाजी काकडे, तहसीलदार प्रशांत सांगडे, उपविभागीय कृषी अधिकारी काळे, तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले, जगन्नाथ गावडे, सुरेश चौधरी, अरुण जाधव, अनिल मुंढे यावेळी उपस्थित होते.
यावेळी काकडे म्हणाल्या, जनशक्ती विकास आघाडीच्यावतीने पिक विम्याबाबत तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिक्षकाकडे शेतकऱ्यांनी समक्ष भेटून सरसकट पिक विमा मिळावा यासाठी वारंवार मागणी करूनही कुठलीच कारवाई झाली नाही. जिल्ह्यात शेवगाव तालुक्यावर पिक विम्याबाबत अन्याय झाला असून सर्वात कमी पीकविमा शेवगाव तालुक्यात आला आहे. इतर तालुक्यात १०० कोटींच्या पुढे व शेवगावला ९ कोटी विमा आणि त्यातही फक्त सत्ताधारी व प्रस्थापित पुढाऱ्यांना व त्यांचे बगलबच्चांनाच पिक विमा मिळाला.
तसेच प्रधानमंत्री पिक विमा योजनेत आपल्या तालुक्यातील अधिकाऱ्यांनी सोयाबीन, कांदा, उडीद पिकांचा समावेशच केलेला नसल्याने अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसला. आता ती चूक दुरुस्त करा. तसेच कांबी येथील कृषी सहाय्यकाची त्वरित बदली करा. शेतकऱ्यांना खते विकत घेताना अन्य खते घेण्याबाबत सक्ती करू नका. असे झाल्यास संबंधितावर कार्यवाही करा. शेतकऱ्यांसाठी खतांचा बफर स्टॉक उपलब्ध करा. अशा विविध मागण्या यावेळी केल्या व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत शेतकरी हालणार नाही अशी भूमिका काकडे यांनी घेतली.
त्यावर जिल्हा उपविभागीय कृषी अधिकारी व तहसीलदार यांनी तालुक्यातील पूर्ण गावांची तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करून बुधवारी (दि.२४ ) बैठक लावण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच कांबीचे कृषी सहाय्यक यांची बदली करण्यात येऊन पिक विमा योजनेत कांदा, उडीद, सोयाबीनचा समावेश करण्याचा प्रस्ताव त्वरित पाठवू असे लेखी आश्वासन दिले. यावेळी प्रकाश तिजोरे, विष्णू दिवटे, लक्ष्मण गायकवाड, राजेंद्र पोटफोडे, बाजीराव लेंडाळ यांचेसह शेतकरी उपस्थित होते.