कोपरगाव प्रतिनिधी, दि.२८ : भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच कोपरगाव तालुक्यातील ३४१८ कर्जदार शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारच्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळाले आहे. याबाबतीत विरोधकांनी चुकीच्या बातम्या प्रसिध्द करून फुकटचे श्रेय घेऊ नये.
विनाकारण कागदपत्र जमा करण्याचे संदेश पसरून शेतकरी आणि जनतेत संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न करणारे लोकप्रतिनिधी आणि त्यांचे लाभार्थी यांनी खरे अज्ञान कुणाचे हे आता उघड झाले आहे त्यामुळे भविष्यात असे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याचा अतिघाईचा प्रकार विरोधकांनी करू नये असा टोला संवत्सर ग्रामपंचायतचे सदस्य महेश परजणे यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे यांना नाव न घेता लगावला आहे.
दिलीपराव बोरनारे यांनी विवेक कोल्हे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संवत्सरचे ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आमदार आशुतोष काळे यांना एकही बाबतीत ठोस काम करण्यात यश आलेले नाही या वैफल्यग्रस्त मानसिकतेमुळे त्यांचे पदाधिकारी कोल्हे कुटूंबावर टीका करण्यात रस घेत आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केलेली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतरच या योजनेला खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे हे सर्वांना ठाऊक आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह विविध राष्ट्रीयीकृत बँकांकडून घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. या निर्णयाची अतिशय चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी सुरू आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि विविध राष्ट्रीयीकृत बँकांकडून घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील एकूण ७ हजार ४७७ शेतकऱ्यांना महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अनुदान शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केले आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्यात कोपरगाव तालुक्यातील १ हजार ३२३ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अनुदान जमा झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात २ हजार ९५ शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान वर्ग करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
कोपरगाव तालुक्यातील कर्जदार शेतकऱ्यांना महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान त्वरित मिळावे, यासाठी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याची फलश्रुती म्हणून कोपरगाव तालुक्यातील १३२३ शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळाले असून, आता दुसऱ्या टप्प्यात तालुक्यातील २०९५ शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान वितरण करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
या अनुदानापासून वंचित असलेल्या उर्वरित ४०५९ शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळवून देण्यासाठी स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांच्याकडून शासनाकडे पाठपुरावा केला जात असल्याचे महेश परजणे यांनी नमूद केले आहे.
कर्जदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली असून, यामध्ये आमदारांचे कवडीचेही योगदान नाही. प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेण्याचा निव्वळ फार्स करणाऱ्या आणि काहीही ठोस काम न करता उलट फुकटचे श्रेय घेण्याची सवय लागलेल्या मंडळींकडून अर्धवट माहितीच्या आधारावर चुकीच्या बातम्या प्रसिद्ध करण्याचा खटाटोप सुरू आहे. तसेच शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. यंदा अतिवृष्टी व इतर विविध कारणांमुळे कोपरगाव तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
अशा संकटाच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, त्यादृष्टीने सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. कोपरगाव तालुक्यातील जिल्हा बँकेसह विविध राष्ट्रीयकृत बँकांकडून घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ५० हजार रुपयांचे अनुदान मिळवून देण्यासाठी स्नेहलताताई कोल्हे व विवेक कोल्हे यांनी प्रत्यक्ष शासनदरबारी पाठपुरावा केला. त्यामुळे अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना शासनाकडून हे अनुदान प्राप्त झाले असून, त्यांना मोठा आधार मिळाला आहे. त्याबद्दल संबंधित शेतकरी शिंदे-फडणवीस सरकार व कोल्हे यांना धन्यवाद देत आहेत. हे विरोधकांना सहन होत नसल्यामुळे त्यांच्याकडून फुकटचे श्रेय घेण्याचा व शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.
आम्ही खोट्या बातम्या प्रसिद्ध करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत नाही तर जनतेला शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने शासनदरबारी प्रयत्न करतो आणि ते प्रयत्न यशस्वी होऊन जनतेला लाभ मिळतो ही वस्तुस्थिती आमदार काळे व त्यांचे अतिउत्साही पदाधिकारी यांना अज्ञानामुळे पचवने कठीण जाते आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकरी व जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी खऱ्या अर्थाने कोण काम करीत आहे, आणि केवळ प्रसिध्दीसाठी आधी संभ्रम पसरवायचा आणि नंतर स्वतःच श्रेय घेण्यासाठी पुढे कोण येतंय हे जनतेला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे, असा शालजोडीतला उपरोधिक टोला परजणे यांनी बोरनारे यांना लगावला आहे.