शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ : तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून झाली. त्यामुळे त्या अत्यंत चुरशीच्या झाल्या. या निवडणुकीत राष्ट्रवादीने सर्वाधिक ७, भारतीय जनता पक्षाने ३, तर जन शक्ती विकास आघाडी व अपक्षाने एकेका ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर विजय मिळविला. आता आज गुरुवारी (दि.२९ ) या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडी होणार असल्याने काही ठिकाणी चुरस निर्माण झाली आहे.
तालुक्यातील दहीगाव ने, खानापूर, आखेगाव, अमरापूर, जोहरापूर, रांजणी, भायगाव, खामगाव, सुलतानपूर खुर्द, रावतळे–कुरुड्गाव, वाघोली व प्रभूवाडगाव या १२ ग्रामपंचायतीपैकी आखेगाव, अमरापूर व खामगाव या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच एका मंडळाचे तर सदस्य दुसऱ्या मंडळाचे निवडून आल्याने या ठिकाणी उपसरपंच पदाच्या निवडणुकीला विशेष महत्व आहे. उपसरपंचाच्या निवडी सरपंचाच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून संबधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे सहाय्यक म्हणून काम पाहणार आहेत. तसेच या निवडणुकांसाठी प्रत्येक गावी निवडणूक विभागाने निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत.