माय-लेक, पिता-पुत्र व मॅनेजरच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : माय, लेक तसेच तालुक्यातील गदेवाडी येथील तीन, अशा पाच जणांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले. शेअर मार्केटमध्ये गंडविल्या गेलेल्यायाच्या गुन्ह्यांची संख्या वाढती आहे.

 साईनाथ नामदेव भागवत ( रा. एरंडगाव भागवत, हल्ली रा. जुना प्रेस शेवगाव ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अनिरुध्द मुकुंद धस व त्याची आई वैशाली मुकुंद धस ( रा. एरंडगाव धस हल्ली रा. सातपुते नगर, शेवगाव ) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. एडी ट्रेडींग कंपनी या नावाने अंबिका कॉलनी, पाथर्डी रोड याठिकाणी धस याने शेअर मार्केट ट्रेडिंग व्यवसाय सुरु केला होता.

भागवत हे त्याच्या ऑफीस मध्ये गेले असता, त्याने गुंतवणूक करणाऱ्या लोकांना ८ टक्के दराने प्रती महिना परतावा मिळुन देतो, पैशाची गुंतवणूक करा, तुम्हाला देखील चांगला परतावा मिळुन देईल असे सांगितले. भागवत यांनी विश्वास ठेऊन, वेळोवेळी ५ लाख रुपये, खात्यावर टाकले. तसेच मध्यस्थीच्या माध्यमातून दोन लाख रुपये रोख स्वरुपात दिले. अशी एकूण सात लाख रूपयांची गुंतवणूक केली. एक महिन्यांनी भागवत हे परतावा मागण्यास गेले असता, परतावा व मूळ रक्कम देण्यास टाळाटाळ करुन उडवाउडवीची उत्तरं दिल्याचे फिर्यादी मध्ये म्हटले आहे.

जय शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथ इसरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन, तालुक्यातील गदेवाडी येथील अमोल अशोक कदम, अशोक बाबुराव कदम, लक्ष्मण उर्फ बबलू दत्तात्रय मडके यांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
नवनाथ इसरवाडे ५ लाख, किरण दिलीप नाईक १० लाख, राधाकिसन भीवसेन निकम ३ लाख, अनिता गणेश पाखरे, १ लाख, कृष्णा अंबादास म्हस्के २ लाख ५० हजार रुपये, असे एकूण २१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादी मध्ये म्हटले आहे. फसवणूक झालेले नागरिक तक्रार दाखल करण्यासाठी पुढे येत असून दाखल होणार्‍या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. फसवणूक करणारे तसेच झालझा यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.