माजी आमदारांनी उजनी जलसिंचन योजनेची संपूर्ण माहिती घ्यावी – बाबुराव थोरात

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : आपल्या कार्यकाळात उजनी उपसा जलसिंचन योजना चालू आहे बंद याची ज्यांना माहिती नव्हती. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या अर्धवट ऐकीव माहितीवर उजनी उपसा जलसिंचन योजनेबद्दल श्रेय घेणे केविलवाणे असून यालाच म्हणतात ‘आयत्या पिठावर रेघा’ असा उपरोधिक टोला रांजणगांव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजनेचे अध्यक्ष बाबुराव थोरात यांनी मा.आ.कोल्हेंना लगावला आहे.  

रांजणगाव देशमुख, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, मनेगाव ह्या कायम स्वरूपी दुष्काळी असलेल्या गावांसाठी वरदान ठरलेली रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजना २०१५ ला बंद पडली होती. मात्र आ.आशुतोष काळे यांनी या योजनेवर अवलंबून असणाऱ्या गावातील नागरिकांना हि योजना सुरु करण्याचा शब्द दिला होता. दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी निवडून येताच २०१९ मध्ये  या योजनेचे सर्व थकीत वीज बिल, आवश्यक असणाऱ्या पाईप लाईन दुरुस्त्या पदरमोड करून उजनी चारी योजनेला ऊर्जितावस्थेत आणून अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून हि योजना आ.आशुतोष काळे यांनी पाच वर्ष सुरु ठेवली आहे.

काही महिन्यांपूर्वी या योजनेचा ट्रान्सफॉर्मर चोरीला गेला होता त्यावेळी पाणी उपलब्ध असतांना योजनेवर अवलंबून असणाऱ्या गावातील नागरिकांना पाण्यापासून वंचित राहू नये यासाठी आ.आशुतोष काळे यांनी स्वखर्चातून भाडे तत्वावर ट्रान्सफॉर्मर आणून योजना सुरु ठेवली होती. दोनच दिवसापूर्वी आ. आशुतोष काळे यांच्या सुचनेनुसार गोदावरीच्या डाव्या-उजव्या कालव्यांना ओव्हर-फ्लोच्या पाण्यातून पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. तसेच शुक्रवार (दि.२६) रोजी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून उजनी चारीला देखील पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या होत्या.

दोन दिवसापुर्वीच आ.आशुतोष काळे यांनी पुन्हा पदरमोड करून नवीन ट्रान्सफॉर्मर बसविला होता. त्यामुळे शनिवार (दि.२७) रोजी सकाळ पासून हि योजना पुन्हा पूर्ववत सुरु झाली आहे. याची अर्धवट माहिती मा.आ.स्नेहलता कोल्हेंच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितली व त्यांनी फोनवर अधिकाऱ्यांशी संभाषण करण्याचे व्हिडीओ सोशल मिडीयावर दाखवत न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा अत्यंत केविलवाणा प्रयत्न केला असल्याचे दिसून येत आहे. कार्यकर्ते त्यांना एक सांगतात व माजी आमदार फोनवर दुसरेच बोलत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांनी अगोदर टप्पा एक व टप्पा दोन समजून घ्यावा असा खोचक सल्ला बाबुराव थोरात यांनी मा.आ.कोल्हेंना दिला आहे.

कायमस्वरूपी दुष्काळी असणाऱ्या जिरायती भागातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा व शेती सिंचनाचा प्रश्न सुटावा यासाठी रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजना आणली गेली. परंतु ज्यांना वर्षानुवर्ष या भागतील जनतेने सत्ता दिली त्यांनीच न परवडणारी योजना असा ठपका ठेवत ही योजना अपूर्णावस्थेतच असतांना जाणीवपूर्वक बासणात गुंडाळून ठेवली होती. परंतु या योजनचे महत्व जाणून असणाऱ्या माजी आमदार अशोकराव काळे यांनी मात्र २००५ साली विधानसभा अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवत स्वत: आर्थिक झळ सोसून हि योजना पूर्ववत सुरु करून सलग १० वर्ष चालविली. या योजनेतून पाझर तलाव भरले जात असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व शेती सिंचनाचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटण्यास मदत तर झालीच परंतु त्याचबरोबर भू-गर्भातील पाणी पातळी देखील वाढण्यास मोठी मदत झाली, तोच कित्ता आ. आशुतोष काळे यांनी गिरवत २०१९ ते २०२४ सलग पाच वर्ष योजना सुरु ठेवली. मात्र ज्यानी त्यांच्या कार्यकाळात या योजनेकडे ढुंकून देखील पाहिले नाही त्यांचा श्रेय घेण्यासाठी सुरु असलेला आटापिटा हास्यास्पद आहे. – बाबुराव थोरात (अध्यक्ष-रांजणगांव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजना)