एखादा खेळाच्या नादी लागला तर त्याच्या नादी लागण्याचे धाडस कोणी करत नाही – डॉ. नरेंद्र घुले

शेवगाव प्रतिनिधी, दि. २७ : शेवगाव तालुक्याने जिल्हा, राज्यच नव्हे तर  देश विदेश पातळीवर गेलेले कबड्डी खोखो कुस्ती अशा विविध क्रीडा क्षेत्रात नामवंत खेळाडू घडविले आहेत. या खेळाडूंनी क्रीडा क्षेत्र संपन्न केले. जीद्द, कष्ट आणि ध्येयाने प्रेरित होऊन  खेळाडूनी आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केले तर यश दूर नसते. जीवनात व्यसनावर मात करायची असेल तर खेळासारखा उत्तम पर्याय नाही. एखादा युवक खेळाच्या नादी लागला तर त्याच्या नादी लागण्याचे धाडस कोणी करणार नाही असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले यांनी केले.

चंद्रशेखर घुले पाटील मित्र मंडळाच्या वतीने पंचक्रोशीतील सर्व गुणवंत खेळाडूंचा सन्मान सोहळा शनिवारी (दि २७) येथील साईलॉन्स मध्ये पार पडला. यावेळी ते अध्यक्ष पदावरून बोलत  होते. यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले, प.स.चे माजी सभापती डॉ. क्षितीज घुले, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, काकासाहेब नरवडे, बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ, उपसभापती गणेश खंबरे, जालन्याचे पोलिस उप अधिक्षक शाम पवार आदिची प्रमुख उपस्थिती होती.

घुले म्हणाले, खेळाडूंनी विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊनआपल्या आवडत्या खेळास प्राधान्य दिले, तर खेळातून निरोगी व सुदृढ शरिरयष्टी राखली जाते.  खेळाडूना सर्वत्र आदराचे स्थान असते. गुणवान खेळाडू आपल्या बरोबर परिसराचा, जन्म भूमिचा नावलौकिक वाढवितात.  तालुक्यात क्रीडा क्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी घुले परिवाराची साथ व सहकार्य कायम राहिल अशी ग्वाही त्यांनी दिली.

  माजी आमदार डॉ. नरेंद्र पाटील घुले यांनी आपल्या कार्यकाळात शेवगाव येथे अत्याधुनिक क्रीडा संकुलाची उभारणी केली. परिसरातील खेळाडूंना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. मात्र सध्या हे क्रीडा संकुल अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. एक प्रकारे खेळाडूंचा त्यातून अवमान होत असल्याने जिल्हा क्रीडा विभागाने शेवगावचे क्रीडा संकुल अतिक्रमण मुक्त करावे अशी मागणी करून येत्या १५ ऑक्टोबरला आपणांस एका मोठ्या  सामन्याला सामोरे जायचे आहे. ७५ दिवस बाकी आहेत. यावेळी आपणांस आपल्या चंद्रशेखर भाऊला निवडून कॅप्टन करायचे व सर्व कामे सांगायची आहेत ! असे यावेळी म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रतिसाद दिला. 

जिल्हा क्रीडा अधिकारी खुरांगे म्हणाले, गुणवत्ता असलेल्या खेळाडूंना समाजाचेही प्रोत्साहन मिळणे आवश्यक असून गावोगावी  क्रीडा क्लब स्थापन होऊन क्लब संस्कृती निर्माण होणे आवश्यक आहे. खेळाडूंसाठी भव्य क्रीडा संकूल निर्माण करून त्यात विविध सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाचा क्रीडा विभाग प्रयत्नशील असून समाजातील क्रीडा प्रेमींनी त्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे.

राष्ट्रीय खेळाडू संजय फडके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी अरुण पाटील लांडे, संजय कोळगे, कल्याण नेमाणे, नंदू मुंढे, रामनाथ राजपुरे
बबनराव भुसारी, अंबादास कळमकर आदिसह क्रीडा प्रेमीची मोठी उपस्थिती होती. सध्या पॅरिस ऑलंपिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधत्व करत असलेला दहिगावनेचा भूमिपुत्र श्रीकांत जाधव याचे पालक दत्तात्रय जाधव, क्रीकेटपटू ऋषिकेश दौंड, पैलवान ऋषिकेश जोशी,निवृत्त पोलीस अधिकारी अल्ताफ शेख, शंतनू पांडव, प्रशांत नाकाडे, विजय निकित, प्रकाश बोरुडे, युवराज बारवकर, वैष्णवी फलके, स्वाती हागे, रावसाहेब शित्रे, रऊफ शेख, यांचेसह तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रातील आजीमाजी खेळाडूंचा प्रमुख अतिथीच्या  हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी क्रिडाशिक्षक एकनाथ शिरसाठ, राजेंद्र  दौड, माजी सभापती डॉ. घुले, कबड्डीपटू फिरोज पठाण आदिची भाषणे झाली. सुत्रसंचलन मच्छिंद्र पानकर व दिपक कुसळकर यांनी केले तर संजय कोळगे यांनी आभार मानले.