औद्योगिक वसाहत सोसायटीच्या अध्यक्षपदी विवेक कोल्हे व उपाध्यक्षपदी केशव भवर यांची बिनविरोध निवड

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०८ : कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहत (इस्टेट) सोसायटी लि. या संस्थेच्या अध्यक्षपदी युवा नेते विवेक कोल्हे यांची बिनविरोध फेरनिवड झाली असून, उपाध्यक्षपदी केशव भवर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहत (इस्टेट) सोसायटी लि. च्या नूतन संचालक मंडळाची गुरुवारी (८ फेब्रुवारी) बैठक झाली. या बैठकीत औद्योगिक सहकारी वसाहत सोसायटीच्या अध्यक्षपदी विवेक कोल्हे तर उपाध्यक्षपदी केशव भवर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विवेक कोल्हे यांची या संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी विवेक कोल्हे यांचे नाव संचालक परेशशेठ ठोळे यांनी सुचवले व संचालक अभिजीत रहातेकर यांनी त्यास अनुमोदन दिले, तर उपाध्यक्ष पदासाठी केशव भवर यांचे नाव संचालक मनोजशेठ अग्रवाल यांनी सुचवले व संचालक प्रशांत होन यांनी त्याला अनुमोदन दिले.

या बैठकीस संचालक पराग संधान, रोहित वाघ, पंडित भारूड, सागर शहा, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, सिमला सारदा, सुनिता जगदाळे तसेच माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, उद्योजक व माजी संचालक मुनिषशेठ ठोळे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वास महाले, पप्पूशेठ सारदा, संजय जगदाळे, निवडणूक निर्णय एस. पी. नेरे, प्रशासक के. आर. वाळके, औद्योगिक सहकारी वसाहत सोसायटीचे व्यवस्थापक एस. डी. लोखंडे आदी उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष विवेक कोल्हे व उपाध्यक्ष केशव भवर यांच्या हस्ते सर्व नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला.

कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहत सोसायटीच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्यानंतर विवेक कोल्हे म्हणाले, कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग सुरू व्हावेत व त्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. उद्योजकांना पाणी, वीज, रस्ते आदी मूलभूत सुविधा मिळणे गरजेचे आहे.

त्यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये पाणी, विजेसह अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण व मजबुतीकरण, अंडरग्राउंड आरसीसी ड्रेनेजची व्यवस्था व इतर सोयी-सुविधा पुरविण्यास आपण प्राधान्य देणार असून, नूतन संचालक मंडळाच्या मदतीने औद्योगिक वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. त्यासाठी सर्व सभासद, उद्योजक, कारखानदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या माध्यमातून औद्योगिक वसाहतीत ५ एमव्हीए क्षमतेचे दोन नवीन पॉवर ट्रान्सफार्मर बसवून अखंड वीजपुरवठ्याची सोय केली असून, नवीन जलवाहिनीद्वारे पाण्याची व्यवस्था केली आहे. कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहतीसाठी मंजूर असलेल्या १४.६९ आर. जमिनीचा ताबा लवकरात लवकर मिळावा, यासाठी शासनाकडे आपला सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोपरगाव औद्योगिक सहकार वसाहत (इस्टेट) सोसायटीच्या सर्व संचालक व सभासदांनी माझ्यावर विश्वास दाखवत पुन्हा एकदा माझी अध्यक्षपदी निवड केली, त्याबद्दल त्यांनी सर्व संचालक मंडळ, सभासद उद्योजकांचे आभार मानले.