रेणुकामाता देवस्थान चोरीतील टोळी जेरबंद केल्याबद्दल पोलीस दलाचा सत्कार

शेवगाव प्रतिनिधी, दि. २४ : शेवगाव येथील देवस्थानात चोरी झाली तेव्हा आलो असताना रेणुकामाते प्रती असलेल्या येथील लोकाच्या श्रध्दा व भावना लक्षात आल्या. घटनांचे गांभीर्य ओळखून, आम्ही एकाच्या मागावर असताना मातेचीच कृपा झाली, आमच्या सर्व सहकाऱ्याच्या अथक प्रयत्नाला यश आले. तब्बल २२ ठिकाणी चोरी करणारी टोळी जेरबंद झाली. असे तपास लागल्यावर वरिष्ठाकडून, राजकीय मंडळीकडून आमचे कौतूक झाले. मात्र अमरापूर ग्रामस्थ व रेणुका देवस्थानात प्रत्यक्ष मातेच्या दरबारात होणारा सत्कार सोहळा अविस्मरणीय, तसेच दुसऱ्या कोणत्याही सत्कारापेक्षा हा सत्कार मोठा असल्याचे प्रतिपादन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी केले आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री. रेणुकामाता देवस्थानाच्या चोरी घटनेतील, आरोपींना पकडून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिफास्तीने मुद्दे माल हस्तगत करुन त्यांना गजाआड केले. त्याबद्दल श्री रेणुका माता देवस्थानाच्या व अमरापुर ग्रामस्थांच्यावतीने गुन्हे शाखेचा हृद्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ह.भ.प राम महाराज झिंजूर्के, आप्पा महाराज, मा. आ. बाळासाहेब मुरकुटे, पाथर्डीचे माजी नगराध्यक्ष सुभाष घोडके, सरपंच आशाताई गरड, राहुल जोशी, गणेश शेंडगे, रामदास गोल्हार, श्रीमंत घुले यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.      

आहेर पुढे म्हणाले, येथे ज्या व्यासपिठावर अधिकाऱ्याचा सत्कार होत आहे. त्याच व्यासपिठावर माझ्या सर्व सहकाऱ्याचा ही सत्कार झाला, याचा मला अभिमान आहे. प्रत्येक घटना पोलिसाच्या दृष्टीने गांभीर्याची असते. येथे ही आम्ही आमचे काम केले आहे. एक प्रकारे ही रेणुका मातेची सेवा घडली आहे.

ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत भालेराव यांनी देवस्थान चोरी प्रकरणाचा तपास लावल्या बद्दल पोलिस यंत्रणेला धन्यवाद देऊन देवस्थानात चोरी झाली. यापेक्षा असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रत्यक्ष रेणुका आईसाहेबांच्या व्यासपीठावर चोरटे बिनदिक्कत पादत्राणासह चढले ही घटनाच मला मोठी व्यथीत करणारी, सहन होण्या पलीकडची आहे. अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी ते अत्यंत भावनावश झाले होते. रमेश अप्पा महाराज, व मा. आ. मुरकुटे यांनीही पोलिसांच्या कामगिरी बद्दल कौतूक केले.

प्रारंभी शनिवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक दिनेश आहेर हे पथकासह अमरापुर गावात दाखल होताच त्यांचे फटाक्यांची आतषबाजी करुन जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी अमरापुर ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थाच्या वतीने सर्व पथकाचा सत्कार करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेच्या कामगिरी बद्दल त्यांचे कौतूक व प्रोत्साहन म्हणून डॉ. भालेराव यांनी ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले. तेव्हा आम्ही आमचे काम केले. ही रेणुका मातेची सेवा आहे म्हणून ही रक्कम पोलिस दलातील पॉवर लिप्टीग मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या महिला पोलिस अर्चना काळे यांना भेट देत असल्याचे आहेर यांनी नम्रपणे जाहीर केले. यावेळी उपस्थितांनी टाळ्याच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. तसेच गावच्या सरपंच आशा गरड यांनी देखील चोरीचा तपास लावल्याबद्दल कौतुकाची थाप म्हणून यावेळी ११ हजार रुपये रोख बक्षीस दिले. 

त्यानंतर श्री. रेणुका माता मल्टीस्टेट संस्थेच्या वतीने गावातून जिपमधून अधिकाऱ्यांची, ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत भव्य  मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्याचेवर एका बाजूने शाळकरी मुलांनी तर दुसर्या बाजूने ग्रामस्थांनी फुलांची मुक्त उधळण केली. मिरवणूक श्री. रेणुका माता देवस्थान परिसरात दाखल होताच तोफाची आतषबाजी झाली. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे महिलांनी ओवाळून स्वागत केले.

त्यानंतर भक्त निवासात झालेल्या सत्कार सोहळ्यात पोलीस निरिक्षक दिनेश आहेर, स.पो.नि. सोपान गोरे, स.पो.नि. तुषार धाकराव, सहायक फौजदार भाऊसाहेब काळे यांच्या सह पथकातील दत्तात्रय हिंगडे, मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, सुरेश माळी, रविंद्र कर्डीले, संतोष लोढे,  भिमराज खर्से, रणजित जाधव, प्रशांत राठोड, भरत बुधवंत, अरुण मोरे, विजय ठोंबरे, संभाजी कोतकर यांचा फेटा, शाल, श्रीफळ, फुलांचा गुच्छ, मिठाई देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी  हनुमान टाकळी ग्रामस्थ, शेवगाव रोटरी क्लब, शेवगाव पत्रकार संघाच्या वतीने देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुखदेव मर्दाने यांनी केले, तर गणेश शेंडगे यांनी आभार मानले.