जागतिक कीर्तीचे बुद्धिबळपटू तयार होण्यासाठी सहकार्य करू- विवेक कोल्हे

खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत राजवीर शिंदे, ओंकार लोखंडे, शिवप्रसाद काळे विजेतेपदाचे मानकरी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : भारतात क्रिकेटच्या अफाट ग्लॅमरमुळे इतर खेळ झाकोळले जात असताना विश्वनाथन् आनंद, प्रवीण ठिपसे, अभिजीत कुंटे, प्रज्ञानंद आर, कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावल्ली यांच्यासारख्या विश्वविजेत्या खेळाडूंनी बुद्धिबळाला लोकप्रियता मिळवून दिली. त्यांच्यासारखे जागतिक कीर्तीचे बुद्धिबळपटू कोपरगावच्या भूमीत तयार व्हावेत. यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे बुद्धिबळ खेळाडूंना प्रोत्साहन देऊन भरीव मदत करण्यात येईल, अशी ग्वाही सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी दिली.

कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि कोपरगाव चेस व स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या युवा नेते विवेक कोल्हे चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. शहरातील सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेला खेळाडूंकडून उत्स्फूर्त व भरघोस प्रतिसाद मिळाला. यंदा या स्पर्धेचे दुसरे वर्ष होते.

या स्पर्धेत कोपरगाव, येवला, वैजापूर, राहाता, संगमनेर व श्रीरामपूर या सहा तालुक्यातील एकूण ५०४ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. सदर स्पर्धा १४ वर्षे वयोगट, १९ वर्षे वयोगट आणि खुला गट अशा तीन गटात घेण्यात आली‌. स्पर्धेचे उद्घाटन अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट यांनी केले, तर पारितोषिक वितरण युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

या स्पर्धेत १४ वर्षांच्या आतील गटात प्रथम क्रमांक श्रीरामपूर येथील राजवीर शिंदे याने तर १९ वर्षांच्या आतील गटात प्रथम क्रमांक कोपरगावचा खेळाडू ओंकार लोखंडे तर खुल्या गटात श्रीरामपूरच्या शिवप्रसाद काळे याने प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपदाचा चषक जिंकला. १४ वर्षांच्या आतील गटात द्वितीय क्रमांक सार्थक शिंदे (श्रीरामपूर), तृतीय रुद्र आसावा (लोणी), तर १९ वर्षांच्या आतील गटात द्वितीय क्रमांक ओम पाटील (कोपरगाव), तृतीय नामदेव गिरमे (कोपरगाव) व खुल्या गटात द्वितीय क्रमांक तन्मय निळे (राहाता) तर तृतीय क्रमांक अथर्व थोरात (कोपरगाव) यांनी पटकाविला.

या तिन्ही गटातील विजेत्यांना एकूण १० रोख बक्षिसे देण्यात आली. मुली व महिलांसाठी तीन राखीव बक्षिसे देण्यात आली. कोपरगाव, येवला, वैजापूर, राहाता, संगमनेर व श्रीरामपूर अशा सहा तालुक्यातील उत्कृष्ट तीन खेळाडूंनाही चषक देऊन गौरविण्यात आले. यशस्वी स्पर्धकांना एकूण ३० रोख बक्षिसे व ४५ ट्रॉफी देण्यात आल्या. स्पर्धेचे पंच म्हणून गुरुजीत सिंग यांनी तर गुणलेखक म्हणून नितीन सोळके, संकेत गाडे, प्रमोद वाणी, महेश थोरात, यश बंब, नितीन जोरी, प्रशांत चव्हाण, राजेंद्र कोळपकर, राजीव बोधक, साक्षी गाडे, श्रेयस गाडे, तन्मय महाजन, राधेश्याम मालजी यांनी काम पाहिले.

यावेळी महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ तलवारबाजी खेळाडू दिलीप घोडके, बेसबॉल खेळाडू अक्षय आव्हाड, तर ‘खेलो इंडिया’ या राष्ट्रीय योगा स्पर्धेत निवड झाल्याबद्दल प्रज्वल ढाकणे यांना विवेक कोल्हे यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

विवेक कोल्हे यांनी या बुद्धिबळ स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल कोपरगाव चेस व स्पोर्ट्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून बुद्धिबळ खेळातून बौद्धिक विकासाला कशी चालना मिळते याविषयी मार्गदर्शन केले. बुद्धिबळ हा खेळ प्राचीन काळापासून खेळला जात आहे. बुद्धिबळ खेळल्याने आपली बौद्धिक पातळी व तर्कशक्ती वाढण्यास मदत होते. बुद्धिबळ हा खेळ खेळण्यासाठी एकाग्रता, जिद्द, अचूक रणनीती व एकाच वेळी अनेक मार्गांनी विचार करण्याची क्षमता व नवनव्या चाली रचण्याचे कौशल्य आवश्यक असते.

भारतात हा खेळ खूप लोकप्रिय आहे. विश्वनाथन् आनंद, प्रज्ञानंद आर, कोनेरू हम्पी, प्रवीण ठिपसे, अभिजीत कुंटे, हरिका द्रोणावल्ली यांच्यासारख्या अनेक खेळाडूंनी जागतिक स्तरावर भारताचे नाव उंचावले आहे. बुद्धिबळाच्या क्षेत्रात भारताची गौरवशाली परंपरा युवा खेळाडू तितक्याच समर्थपणे पुढे नेत आहेत. हल्ली तरुण पिढी मोबाईल व व्यसनाच्या आहारी जात असून, तरुणांना त्यापासून दूर ठेवण्यासाठी आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी बुद्धिबळासारख्या खेळांना व हा खेळ खेळणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.