एम.पी.एस.सी.परीक्षेत कोपरगावच्या गुणवंतांची कामगिरी अभिमानास्पद – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कोपरगाव तालुक्यातील गुणवंतांनी मिळविलेले यश अभिमानास्पद असून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घेवून यश संपादन करावे असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.

कोपरगाव तालुक्यातील मढी बु. येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी कर्मचारी बाबुराव गवळी यांची कन्या कु. पूजा बाबुराव गवळी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहाय्यक कक्ष अधिकारी परीक्षेत राज्यात मुलींमध्ये प्रथम क्रमांक तसेच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात मुलींमध्ये ९ वा क्रमांक मिळवून राज्यकर निरीक्षक या पदावर निवड झाली आहे.

या मिळविलेल्या दुहेरी यशाबद्दल तसेच डाऊच बु. येथील अक्षय सोपान पवार यांनी देखील राज्यात १५ वा क्रमांक मिळवून सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल व माहेगाव देशमुख येथील सचिन भगुरे यांची सी.आय. एस. एफ. मध्ये निवड झाल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी या गुणवंतांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या याप्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, प्रतिकूल परिस्थिती तुमच्या यशात अडसर ठरू शकत नाही. यश मिळविण्याची मनात जिद्द असेल तर सर्व काही शक्य असल्याचे लोकसेवा परीक्षेत यश मिळविणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील गुणवंतांनी दाखवून दिले आहे. ग्रामीण भागात राहून देखील जिद्द आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद  आहे. त्याचबरोबर हे गुणवंत कोपरगाव मतदार संघातील रहिवासी आहेत याचा सार्थ अभिमान असून त्यामुळे कोपरगाव तालुक्याची मान अभिमानाने उंचावली असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.

याप्रसंगी मढी बु. सरपंच प्रवीण निंबाळकर, रामराव गवळी, बाबुराव गवळी, सौ. विजया गवळी, रामहरी खैरनार, आण्णासाहेब गवळी, धर्मा दहे, भिवराव दहे, जगन्नाथ होन, शिवाजी दहे, बाजीराव होन, नवनाथ चव्हाण, अर्जुन गवळी, ह.भ.प. कल्याण महाराज कासार, ऋषिकेश गवळी, कैलास गवळी, दीपक गवळी, सोपानराव भगुरे  आदी मान्यवर उपस्थित होते.