एसएसजीएम मध्ये ‘शिक्षण सर्वांसाठी समृद्ध महाराष्ट्रासाठी शिष्यवृत्ती योजना’ परिसंवाद संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे ‘शिक्षण सर्वांसाठी समृद्ध महाराष्ट्रासाठी शिष्यवृत्ती योजनांवर चर्चेसाठी परिसंवादाचे’ आयोजन करण्यात आले होते. हा परिसंवाद ‘महाराष्ट्र शासन सहसंचालक उच्च शिक्षण विभाग’ यांच्या आदेशानुसार  दि. २५ जुलै २०२४ रोजी सकाळी ठीक १०.०० ते दुपारी १२.०० या कालावधीत संपन्न झाला. उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण देण्याबाबतच्या अंमलबजावणीची माहिती देणे  हा या मागील हेतू होता.   

      या  संवादामध्ये उच्च व तंत्र शिक्षणमंत्री मा. चंद्रकांत पाटील व इतर पदाधिकार्यांनी विद्यार्थ्यांना, मुलींसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा फी माफ, तसेच महाराष्ट्र शासनाच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठीच्या इतर वेगवेगळ्या उपक्रमाची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकाचे निरसन केले.  याबरोबरच विद्यार्थ्यांनी आपापल्या स्तरावरील समस्या सोडविण्यासाठी एकत्र येऊन ई-मेलद्वारे संपर्क करावा, असे आवाहन केले.

      महाविद्यालयातील या परिसंवादाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्य डॉ. उज्ज्वला भोर  यांनी भूषविले. संवादानंतर विद्यार्थ्याशी हितगुज करताना ज्येष्ठ प्रा. डॉ. एम. डी. सांगळे यांनी ‘महाविद्यालयाची समृद्ध परंपरा व पारदर्शकता वेगवेगळ्या उदाहरणातून विषद केली’. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. उज्ज्वला भोर यांनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या दिन-दलितांपर्यंत, तळागाळापर्यंत शिक्षणगंगा नेण्याच्या भूमिकेला पूरक अशी भूमिका शासनाने घेतल्याबद्दल शासनाचे आभार मानले. 

या योजनेचा लाभ घेऊन ‘विद्यार्थ्यांनी विद्यार्जनाबरोबरच सर्वांगीण विकासासाठी तत्पर राहण्याचे आवाहन केले. तसेच शिष्यवृत्तीसंबधी महाविद्यालय स्तरावर शक्य त्या सर्व अडचणी तातडीने सोडवू असे आश्वासन दिले आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणशुल्क आणि परीक्षा शुल्क या योजनेबद्दल माहिती दिली’.

 या कार्यक्रमासाठी कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. आर. शेंडगे, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. ए. बी. भागवत, ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. एम.डी. सांगळे, नोडल ऑफिसर प्रा. डॉ. एम. आर. यशवंत, प्रा. डॉ. देविदास रणधीर, कार्यालयीन अधीक्षक श्री. सुनील गोसावी, शिष्यवृत्ती विभागतील लिपिक श्री. दीपक हंडोरे, यांसह विद्यार्थी-विद्यार्थिनी  मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रा. डॉ. एम. आर. यशवंत यांनी मानले.