मानसिक, बौद्धिक, शारीरिक विकास होण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये सहभाग घेतला पाहिजे – झिंजुर्के महाराज

शेवगाव प्रतिनिधी, दि.१६ : ज्या विषयात रुची असेल त्या विषयामध्ये भाग घेतला पाहिजे. विद्यालयामध्ये खेळ, रांगोळी, संगीत, विविध भाषा शिकण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी झाले पाहिजे. स्वतःची प्रगती साध्य करायची असेल तर विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये सहभाग घेतला पाहिजे. जी कमतरता आहे. त्याची जास्तीत जास्त तयारी करून आपल्यातल्या उणिवा शोधल्या पाहिजेत. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे .विद्यार्थ्यांनी खेळांमध्ये सहभागी झाले पाहिजे.

अपयश आल्यास नाराज होऊ नये. तसेच सर्वांगीण विकास होण्यासाठी शरीर ठणठणीत हवे. सर्वांगीण विकास साधण्यासाठी जास्तीत जास्त मैदानावर खेळायला हवे. मानसिक, बौद्धिक, शारीरिक विकास होण्यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन ह.भ.प.राम महाराज झिंजुर्के यांनी केले. येथील रेसिडेन्शिअल हायस्कूलमध्ये विद्यालयाचे माजी खेळाडू कै.कार्तिक बाबासाहेब हरदास व कै. किरण बाबासाहेब पोटफोडे यांच्या स्मरणार्थ आयोजित भव्य तालुकास्तरीय खो-खो कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

विद्यालयाचे प्राचार्य बालाजी गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये भव्य तालुकास्तरीय स्पर्धेबाबत माहिती दिली. या तालुकास्तरीय स्पर्धेसाठी  तालुक्यातील एकूण बारा मुला- मुलींचे संघ सहभागी झाले. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी भाऊसाहेब वीर यांनी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केले. यावेळी  सबलस महाराज, शेवगाव स्पोर्ट क्लबचे निलेश झिरपे, रामनाथ रुईकर, प्राचार्य बालाजी गायकवाड, उपमुख्याध्यापक लक्ष्मण सोळसे, पर्यवेक्षक देविदास सोनटक्के, बबन गायकवाड, संजय दळवी तसेच स्पर्धक व सर्व क्रीडा शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब गव्हाळ यांनी केले तर रामनाथ काळे यांनी आभार मानले.