रब्बी हंगामातील नैसर्गिक आपत्तीच्या लाभासाठी ई-पीक पाहणी करून घ्यावी – राजेश परजणे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१६ : रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होणाऱ्या पिकांचा पीक विमा तसेच इतर सवलतींचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपापल्या अँड्रॉइड मोबाईलवर पीक पाहणी ॲप डाऊनलोड करून ई-पीक पाहणी तातडीने करून घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी केले. आक्टोंबर २०२३  पासून रब्बी हंगामास सुरुवात झालेली आहे. सर्व शेतक-यांना यापुढे अँड्रॉइड मोबाईलवर पीक पाहणी ॲप डाऊनलोड करून रब्बी हंगामातील पिकांची पीक पाहणी करावयाची आहे. ई-पीक पाहणी केल्यामुळे शेतक-यांना नैसर्गिक आपत्ती आल्यास पीक विमा व इतर सवलतींचा लाभ मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणेला मदत होते. त्यामुळे सर्व शेतक-यानी ई-पीक पाहणी करणे हितावह आहे.

ऑनलाईन पीक पाहणीबाबत शेतकरी बांधवांना पुरेशी माहिती नसल्यामुळे कोपरगाव तहसील कार्यालयातर्फे चला शेतात जाऊ या, पीक पाहणी करुया हा एक दिवसीय अभिनव उपक्रम शनिवार दि.२३ डिसेंबर २०२३ रोजी राबविण्यात येणार आहे. या दिवशी कोपरगाव तालुक्यातील सर्व गावामध्ये एकाच वेळी ई-पीकपाहणी करण्यात येणार आहे. याकामी तालुक्यातील नायब तहसीलदार, सर्व तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक हे गावी हजर राहून खातेदारांना ई – पीक पाहणी ॲप कसा डाऊनलोड करावा व कशा पध्दतीने ई-पीक पाहणी करावी याचे प्रात्यक्षिक दाखवून ई-पीक पाहणी करण्यास मदत करणार आहे.

शेतकरी बांधवांनी आपापल्या शेतात हजर राहून पीक पाहणी नोंदविण्याचे आवाहन शिर्डी उपविभागीय कार्यालयाचे उपविभागीय अधिकारी, व कोपरगावचे तहसीलदार यांच्यातर्फे करण्यात आले आहे. सर्व शेतकरी बाधवांनी आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर ई-पीक पाहणी ॲप घेवून पीक पाहणी करावी. तसेच अडचण असल्यास आपल्या गावचे तलाठी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही परजणे पाटील यांनी केले आहे.