विवेक कोल्हे यांनी ग्रामस्थांना दिलेला शब्द केला पूर्ण – कैलास राहणे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१६ : कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद व शहापूर येथील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी उजनी उपसा सिंचन योजनेचा टप्पा क्र.१ तातडीने सुरू करून त्यातून या भागातील पाझर तलाव भरून देण्याची मागणी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी केली होती. त्यानुसार जलसंपदा विभागाने ही योजना कार्यान्वित केली असून, गोदावरी उजव्या कालव्यातून पाणी उचलून धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद व शहापूर येथील पाझर तलाव भरण्याचे काम सुरू झाले आहे. या परिसरातील पाणीप्रश्न सोडविण्याबाबत विवेक कोल्हे यांनी स्वत: वीजबिल भरून ग्रामस्थांना दिलेला शब्द अखेर पूर्ण केला आहे. त्यामुळे धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद व शहापूर येथील ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत, अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष कैलास राहणे यांनी दिली.  

धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद व शहापूर या गावांना गोदावरी उजव्या कालव्यातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (एमजीपी) योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या काही दिवसांपासून सदर योजना नादुरुस्त असल्यामुळे धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद, शहापूर या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थ हैराण झाले होते. या गावातील ग्रामस्थांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांना भेटून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती. त्यावर विवेक कोल्हे यांनी गेल्या २८ नोव्हेंबर रोजी या गावातील ग्रामस्थांसह तहसीलदार संदीप भोसले व गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना निवेदन देऊन धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद व शहापूर या गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी उजनी उपसा सिंचन योजनेचा टप्पा क्र.१ तातडीने सुरू करून त्यातून धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद व शहापूर येथील पाझर तलाव भरून द्यावेत, अशी आग्रही मागणी केली होती.

त्यानंतर गटविकास अधिकारी सूर्यवंशी यांनी लगेचच उजनी उपसा सिंचन योजनेचा टप्पा क्र.१ चालू करण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष पाहणी केली होती. या योजनेसाठी गोदावरी उजव्या कालव्यातून उपसा पद्धतीने पाणी घेण्यासाठी विजेची गरज होती. पण वीजबिल थकल्यामुळे पाणी घेण्यास अडचण निर्माण झाली होती. ही अडचणही विवेक कोल्हे यांनी स्वत: थकित वीजबिल भरून दूर केली आहे. विवेक कोल्हे यांनी थकित वीजबिल भरल्यामुळे अखेर शनिवारी (१६ डिसेंबर) उजनी उपसा सिंचन योजना टप्पा क्र.१ सुरू करण्यात आली आहे.

सध्या गोदावरी उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू असून, त्यातून पाणी उचलून धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद व शहापूर येथील पाझर तलाव भरले जात आहेत. या योजनेचा टप्पा क्र. २ लवकरच सुरू करण्यात येणार असून, त्यातून रांजणगाव देशमुख व अंजनापूर येथील पाझर तलाव भरण्यात येणार आहेत. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष कैलास राहणे, रावसाहेब (बंडू) थोरात, महेश थोरात, बाबासाहेब थोरात, बाबासाहेब नेहे, वीरेंद्र वर्पे, सुनील थोरात, ज्ञानदेव थोरात, वाल्मिक नेहे, त्र्यंबक वर्पे, बाळासाहेब काकडे, गोरख दरेकर, प्रकाश गोर्डे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आमदार असताना शासनाकडे आग्रह धरून रांजणगाव देशमुख प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पीडी वीज कनेक्शन चालू करून घेतले होते. त्यामुळे या भागातील पाण्याचा प्रश्न सुटला होता. आता युवा नेते विवेक कोल्हे यांनी धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद व शहापूर या गावातील पाणीप्रश्न बिकट बनल्याची गंभीर दखल घेऊन ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला आणि त्यांच्या प्रयत्नामुळे उजनी उपसा सिंचन योजना टप्पा क्र.१ सुरू झाली आहे. त्यामुळे धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद, शहापूर व परिसरातील ग्रामस्थांनी कोल्हे यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. तसेच गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचेही ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.