वन विभागांने पिंजरा लावण्याची नागरिकांची मागणी
कोपरगांव प्रतिनिधी, दि. १ : तालुक्यातील संवत्सर परिसरातील लक्ष्मणवाडी कासली रेल्वे गेट हददीत हिंस्त्र बिबट्याचा मुक्त वावर वाढला असुन या भागातील रहिवासी नागरिकांसह शेतक-यांना तसेच शेतात कामाला जाणा-या महिला वर्गामध्ये मोठी भिती निर्माण झाली असुन याठिकाणी पिंजरा लावुन त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील रहिवासीयांनी केली आहे.
लक्ष्मणवाडी कासली गेट हददीत हा बिबट्या अनेक महिन्यांपासुन वास्तव्यास आहे. या परिसरातील शेतक-यांच्या अनेक शेळया तसेच भटकी कुत्री आदिंचा त्याने फडशा पाडलेला आहे. त्याचप्रमाणे हरणांचा येथे वावर असल्यांने त्याचीही तो शिकार करतो. बुधवारी सायंकाळी पावणेसात वाजेच्या दरम्यान आण्णासाहेब रोहोम यांच्यासह आणखी दोन तीन जणांच्या नजरेस हा बिबट्या आला.
संध्याकाळच्या वेळेस शेतकरी दुध घालण्यांसाठी ये जा करतात त्यांच्यावर देखील एक दोन वेळेस झडप घातलेल्या आहेत., परिणामी येथे बिबट्याची भिती निर्माण झाली आहे. आजुबाजुला शेती महामंडळाची जमिन आहे त्यात सोसाबीनचे पिक आहे, त्यातही हा बिबटया लपुन बसतो, शेतक-यांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी जाता येत नाही. सायंकाळच्या वेळेस शाळेतुन ये जा करणा-या विद्यार्थ्यांमध्येही या बिबट्याची दहशत आहे.
अनेक महिला वर्ग शेतात कामासाठी येत जात असतात त्यांनाही भिती असल्याने कामास बाहेर पडता येत नाही, कोपरगांव वन विभागाच्या अधिका-यांना याबाबत अनेकवेळा तकार करण्यांत आलेली आहे. तेंव्हा या बिबटयाचा तातडीने बंदोबस्त करावा अशी याभागातील नागरिकांची मागणी आहे.