शेवगाव प्रतिनिधी, दि. ४ : दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांच्या विविध महत्त्वपूर्ण प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी येत्या शुक्रवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी दुपारी अकरा वाजता छत्रपती संभाजीनगर येथे दिव्यांगांचा प्रचंड आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी परिसरातील दिव्यांगां नी मोठ्या संख्येने हजर रहावे असे आवाहन शेवगाव संघटनेने केले आहे.
यावेळी दिव्यांगांना प्रति सहा हजार रुपये पेन्शन मिळावे. भूमीहीन बेघर दिव्यांगांना राहण्यासाठी एक गुंठा जागा शासनाकडून मोफत मिळावी. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महानगरपालिका मध्ये दिव्यांगांना राजकीय आरक्षण मिळावे. सार्वजनिक ठिकाणे व सरकारी कार्यालयात अडथळा विरहित करण्यात यावी. दिव्यांगांची दहा लाखांची आरोग्य विमा पॉलिसी सरकारने काढून द्यावी. दिव्यांगांना सरकारी नोकरीत प्राधान्य मिळावे तसेच दिव्यांगांना विविध व्यवसाय करण्यासाठी जागा खेळते भांडवल मिळावे आदी महत्वपूर्ण मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी हे दिव्यांग जन आक्रोश आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
अभी नही तो कभी नही या न्यायाने ठिकठिकाणी अनाथ निराधार शेतकऱ्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मोर्चाची माहिती देण्यासाठी येथील प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख गणेश हनवते यांच्या शेवगाव येथील संपर्क कार्यालयात तालुक्यातील दिव्यांगांची विशेष बैठक पार पडली. प्रहारच्या महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मीताई देशमुख, लक्ष्मण अभंग, किशोर गरंडवाल, लक्ष्मण शिंदे, विठ्ठल घवले, सुभाष मोहिते, महिला संघटनेच्या अध्यक्ष सुजाता बडे, सुनीता नांगरे योगेश हनवते, सिद्धार्थ बटुळे, भवर बाबामीया सय्यद, दादासाहेब कणसे आदींसह दिव्यांग बांधवांची मोठी उपस्थिती होती.
संघटनेचे प्रमुख पदाधिकारी तालुक्यातील विविध गावात जाऊन दिव्यांग बांधवांशी आंदोलनाबाबत संपर्क करीत असून कोणत्याही परिस्थितीत शेवगाव तालुक्याची उपस्थिती जास्तीत जास्त राहील या दृष्टीने आंदोलकांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा संपर्कप्रमुख हनवते यांनी येथे दिली.