दर्जेदार शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे – भालसिंग

शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : सध्या स्पर्धेचा काळ आहे. अशावेळी शिक्षण क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. म्हणूनच  ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यास दर्जेदार शैक्षणिक सुविधा पुरवणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन भाजपा युवा मोर्च्याचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश भालसिंग यांनी केले.

माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यात सलग दुसऱ्यांदा दीड कोटीचे प्रथम पारितोषिक प्राप्त केलेल्या तालुक्यातील वाघोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत खा. सुजय विखे यांच्या निधीतून देण्यात आलेल्या डिजिटल क्लासरूमचे उदघाटन व उद्योजक इंद्रजीत देशमुख यांच्या संकल्प अभिनव भारत फौंडेशनच्या वतीने वाघोली व बहीरोबावस्ती शाळेस १० हजार रुपयांचे क्रीडा साहीत्य सरपंच सुश्मिता भालसिंग यांच्या हस्ते भेट देण्यात आले. यावेळी भालसिंग बोलत होते. यावेळी उपसरपंच सुखदेव शेळके, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय तनपुरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुभाष दातीर, ग्रामसेविका जनाबाई फटाले, अर्जुन देशमुख, दिनकर फुंदे, दगडू बोरुडे आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी भालसिंग म्हणाले, शिक्षण, आरोग्य, कृषी, पर्यावरण व जलसंवर्धन या पंचसुत्रीवर आधारीत केलेल्या कामामुळे वाघोलीची वाटचाल राज्यस्तरापर्यंत पोहचली आहे. येथील जिल्हा परीषद शाळेत दर्जेदार पध्दतीने शिक्षण दिले जात असल्याने शैक्षणिक क्षेत्रातही गावची घोडदौड सुरु आहे. कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुत्रसंचालन मुख्याध्यापक प्रमिला गोरे यांनी केले. तर महेश आहेर यांनी आभार मानले.