ताजनापूर लिफ्टचे पाणी चापडगाव, प्रभूवाडगाव शिवारातील बंधाऱ्यात सोडा

शेवगाव प्रतिनिधी, दि.१८ :   तालुक्यातील ताजनापूर लिफ्ट क्रमांक दोनच्या पाण्याची चाचणी पूर्ण झाली असून या योजनेचे पाणी चापडगावच्या कुंडा पर्यंत आले असून ते पाणी नदीत सोडून चापडगाव व प्रभूवाडगाव शिवारातील बंधारे भरावेत अशी मागणी या परिसरातील शेतकर्यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण नेमाने यांनी यासंबंधी माहिती दिली.

यासंदर्भात तहसीलदार प्रशांत सांगडे यांचेकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दुष्काळी परिस्थितीशी कायम संघर्ष करणाऱ्या तालुक्याच्या पूर्व भागातील गावाना ताजनापूर उपसा जलसिचन योजना नवसंजीवनी देणारी आहे. सध्या हे पाणी चापडगाव नदीत सोडल्यास या परिसरातील अनेक गावाना त्याचा लाभ मिळेल. तसेच याच नदीवर असलेले  बंधारे व प्रभूवाडगाव परिसरातील बंधारे या पाण्याने भरून दिल्यास त्या परिसरातील पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा चाऱ्याचा व पाण्याचाही प्रश्न मार्गी लागणार आहे.

यंदाच्या पावसाळ्यात निसर्गाने अवकृपा केली. परिसरात अत्यंत कमी पाऊस पडला त्यामुळे खरीपासह रब्बी हंगामही अडचणीत आला. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिक भर पडली. याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. आठ दिवसात सकारात्मक कारवाई झाली नाही तर गुरुवार दि.२८ डिसेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन पुकारून या मागणीचा पाठपुरावा करण्यात येईल असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

यावेळी नेमाने यांच्यासह चापडगावचे माजी सरपंच पंडित नेमाने, शहादेव पातकळ, संतोष गायकवाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, अशोक पातकळ, भाऊसाहेब गोरे, अशोक दराडे, आदिनाथ बटुळे, मोहन जगताप, सुनील गायकवाड, विठ्ठल मते आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.