आज कीर्तनाचा बाजार झालाय – स्वामी भारतानंद गिरी

शेवगाव प्रतिनिधी, दि. १८ : आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेत अनेकांनी जर्जर म्हातारे होईपर्यंत वारकरी शिक्षणाचे मोफत धडे दिले. संस्कारित करून   कीर्तनकार तयार केले. मात्र, त्यातील अनेकांनी आपल्या संस्काराची बूज राखली नाही. त्यांनी कीर्तनाचा बाजार मांडला. काही कीर्तनकार तर एकेका कीर्तनाचे ३०-४० हजार रुपये घेतात. ही सांप्रदायामध्ये मोठी खेदजनक बाब असल्याची परखड टीका स्वामी भारतानंद गिरी यांनी येथे केली.     कर्हेटाकळी येथील श्रीनाथ आश्रमात ते विठ्ठल रुक्मिणी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात प्रसंगी बोलत होते.

यावेळी देवगड संस्थांचे महंत भास्करगिरी महाराज, वेदांताचार्य जंगले महाराज शास्त्री, स्वामी ब्रह्मानंद गिरीजी, अर्जुन महाराज लाड गुरुजी, स्वामी प्रकाश आनंद गिरी महाराज, श्रीनाथ आश्रमचे गुरुवर्य सतीश महाराज घाडगे, यांच्या सह महिला, ग्रामस्थ व राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी स्वामी भारतानंद म्हणाले, ज्यांनी समाजाचा उद्धार केला. ते ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, माऊली दांडेकर, जोग महाराज यांनी कीर्तनाचे कधी कोणाकडून काहीही घेतले नाही. असे सांगून कीर्तनकारांनीही कीर्तनाचा व्यवसाय करू नये. त्याचे पाप लागेल. संप्रदायाचे नाश करणारे विनाशकाली बनू नका. तुम्ही जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये मोफत शिकलात, नामवंत कीर्तनकार झालात आणि लोकांकडून पैसे घेता. तुम्ही देखील समाजासाठी सामाजिक काम करा.

आत्तापर्यंत आळंदीमध्ये संस्थेने व अनेक साधुसंतांनी कीर्तनकार घडवले एवढे जर समाज संस्कारित करण्याच्या कामाला लागले तर निश्चित काया पालट झाल्याशिवाय राहणार नाही. सर्व कीर्तनकारानी ठरवले तर पाप व अधर्म कायमचा पळून जाईल. तुम्ही जे शिक्षण घेतले ते फक्त पोटापाण्यासाठी बायका पोरं सांभाळण्यासाठी नसून त्याचा समाजाच्या उद्धारासाठी वापर झाला पाहिजे. असा हितोपदेश स्वामी भारतानंद गिरी यांनी व्यावसायिक कीर्तनकारा ना केला.