पत्रकार रासकर यांच्या बंगल्यात चोरी, २००० अमेरिकन डॉलरसह, चांदी पळवली

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ :  येथील ज्येष्ठ पत्रकार सुरेश दगडोबा रासकर यांच्या धारणगाव रस्त्या नजीक मुशर्तपुर येथे असलेल्या बंगल्यावर पाच ते सात चोरट्यांनी रात्री एक वाजता कडी कोयंडा तोडून ५० हजार रुपयाची चांदी व चांदीचे भांडे, पंधरा हजार रुपये रोख रक्कम व दोन हजार अमेरिकन डॉलर  (अंदाजे किंमत एक लाख ६० हजार) असा ऐवज चोरून नेला आहे अशी माहिती सुरेश रासकर यांचे भाचे व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.                                     

याबाबत अधिक माहिती अशी, ज्येष्ठ पत्रकार सुरेश रासकर हे सध्या प्रकृतीच्या कारणामुळे मुलगा शंकेश रासकर यांचेकडे पुणे येथे वास्तव्यास आहे. त्यांचा धारणगाव रस्त्या लगत मोठा बंगला आहे. तेथे बंगल्याला राखणदार म्हणून वाचमन ठेवला आहे. मात्र अज्ञात पाच ते सात चोरट्यांनी पाळत ठेवून रात्री कडी कोयंडे तोडून बंगल्यात प्रवेश करून घरातील कपाटातील सामानांची उचकपाचक करून त्यातील पन्नास हजार रुपये रकमेची चांदी, चांदीचे भांडे, पंधरा हजार रुपये रोख रक्कम, २ हजार अमेरिकन डॉलर (अंदाजे किंमत एक लाख साठ हजार रुपये ) अशा किमतीचा ऐवज चोरून नेला.

वॉचमन झोपलेले होते. त्यांच्या घरातील टीव्ही देखील ते घेऊन जात होते. मात्र आवाजाने वॉचमन जागा झाल्याने टी.व्ही बंगल्याच्या परिसरातच सोडून त्यांनी पळ काढला. याबाबत रासकर यांचे पुतणे प्रसाद रासकर हे कोपरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिय करत आहे.