मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला विवेक कोल्हे यांचा पाठिंबा 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोपरगाव शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणाला सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी सोमवारी (३० ऑक्टोबर) भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी रास्त असून, सरकारने मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण त्वरित देऊन न्याय द्यावा, असे आवाहन कोल्हे यांनी केले.

मराठा समाजाला सरसकट ‘कुणबी’ जातीचे प्रमाणपत्र देऊन कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा सहा दिवस झाले. त्यांना पाठिंबा म्हणून राज्यात ठिकठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने उपोषण, आंदोलन केले जात आहे.

कोपरगाव शहरातही सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ साखळी उपोषण सुरू आहे. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला. तसेच उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास विवेक कोल्हे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. 

याप्रसंगी उपोषणकर्ते विनय भगत, अनिल गायकवाड, बाळासाहेब जाधव, अमित आढाव, सुनील साळुंके तसेच सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब नरोडे, माजी जि. प. सदस्य केशव भवर, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, न.प. तील माजी गटनेते रवींद्र पाठक, विनोद राक्षे, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, मनसेचे संतोष गंगवाल,

माजी नगरसेवक बबलूशेठ वाणी, गणेश आढाव, संदीप देवकर, अशोक लकारे, संजय जगदाळे, दीपक जपे, बापू पवार, ‘अमृत संजीवनी’ चे संचालक गोपीनाथ गायकवाड, विनायक गायकवाड, सतीश रानोडे, रवींद्र रोहमारे, संतोष साबळे, हरिभाऊ लोहकणे, दत्तात्रय डोखे, दिनेश पवार, सोनूसिंग भाटिया, दीपक पंजाबी, रुपेश सिनगर, राजेंद्र पाटणकर, हाशमभाई पटेल, राहुल सूर्यवंशी, भैय्या नागरे, अशोक नायकुडे, स्वराज सूर्यवंशी, दिनेश गाडेकर, साई नरोडे आदींसह मराठा समाजबांधव, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठा समाजाच्या साखळी उपोषणास आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचे सांगून विवेक कोल्हे म्हणाले, मराठा समाज हा जगाचा पोशिंदा व अन्नदाता असून, गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजबांधव शेती व्यवसाय करतात. निसर्गाच्या अवकृपेमुळे शेती व्यवसाय बेभरवशाचा झाला असून, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास असलेला मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणासाठी लढत आहे. आरक्षणासह इतर मागण्यांसाठी यापूर्वी सकल मराठा समाजबांधवांनी राज्यभर शांततेत मूकमोर्चे काढले. त्याची संपूर्ण जगाने दखल घेतली.

मराठा समाज हलाखीचे जीवन जगत असून, समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण मिळणे आवश्यक आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे व आपण स्वत: समाजाच्या भावना शासनाकडे कळवल्या असून, हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची विनंती केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे.

सरकारने मराठा आरक्षणाबाबत लवकरात योग्य निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. आता मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी एकवटला असून, सरकार समाजाला निश्चितच न्याय देईल, अशी अपेक्षा व्यक्त करून कोणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन विवेक कोल्हे यांनी केले.