नऊ दिवस नव्हे, तर वर्षभर स्त्रीशक्तीचा आदर-सन्मान करा – विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.३० : नवरात्राच्या निमित्ताने स्त्रीशक्तीचा गौरव, देवीचे जागरण करणे ही आपली परंपरा आहे. दरवर्षी आदिशक्ती म्हणून नवरात्रोत्सवात स्त्री सामर्थ्याचा जागर व स्त्रीशक्तीचा गौरव केला जातो. आपण लक्ष्मीच्या रूपाने स्त्रीकडे पाहिले पाहिजे. जर घरातील स्त्री सुखी नसेल तर ते घर सुखी राहू शकत नाही. केवळ नवरात्रोत्सवात नऊ दिवसच नव्हे तर वर्षभर ३६५ दिवस आपण स्त्रीशक्तीचा जागर आणि आदर-सन्मान केला पाहिजे, असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले.

कोपरगाव शहरातील निवारा भागातील सुभद्रानगर येथील सप्तशृंगी कॉलनीतील साई निवारा मित्रमंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव-२०२३ निमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण, श्री सप्तशृंगी माता मंदिराचा आठवा वर्धापन दिन व कोजागिरी पौर्णिमा उत्सवप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे तथा समता पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब कोयटे, माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे, समता पतसंस्थेचे सरव्यवस्थापक सचिन भट्टड, रामनाथ आव्हाड, बापू इनामके, ओमप्रकाश जोशी, महेश नागरे, नीलेश बोरावके, माजी नगरसेविका दीपा गिरमे, नंदिनी कदम, प्रभा कदम, दिपिका भारस्कर, संगीता सारवान, वैशाली जाधव, कुलकर्णी, चिखले, विष्णुपंत गायकवाड, अमोल राजूरकर, दशरथ सारवान, संतोष बैरागी, सिद्धार्थ पाटणकर,

गणेश कदम, ओम उदावंत, वसंत डुकरे, अक्षय शिंदे, साई गाडे, स्वप्नील राऊत आदींसह सुभद्रानगर, निवारा व परिसरातील नागरिक, भाविक-भक्त तसेच साई निवारा मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी नगरसेवक जनार्दन कदम यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, तर वैभव गिरमे यांनी आभार मानले. यावेळी युवा नेते विवेक कोल्हे, सचिन भट्टड, ओमप्रकाश जोशी, महेश नागरे, नीलेश बोरावके आदींच्या हस्ते श्री सप्तशृंगी मातेची विधिवत आरती करण्यात आली.

यावेळी विवेक कोल्हे म्हणाले, दरवर्षी नवरात्रोत्सवात नऊ दिवस आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाचे क्षण येत असतात. आपण सर्वजण अडीअडचणी, दु:ख विसरून देवीमातेच्या भक्तीत तल्लीन होऊन आराधना करत असतो. महिला भगिनी नवरात्रोत्सवात उत्साहाने व हिरीरीने सहभागी होऊन उत्सवाचा आनंद घेत असतात. गणेशोत्सवात जसा तरुणांचा वरचष्मा असतो तसे आता नवरात्रोत्सवात महिलांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

नवरात्रोत्सवात मी कोपरगाव शहर व तालुक्यासह मतदारसंघातील अनेक नवरात्रोत्सव मंडळांना भेटी दिल्या. विविध नवरात्रोत्सव मंडळांकडून राबविण्यात येणारे धार्मिक व सामाजिक उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहेत. काकासाहेब कोयटे यांनी दूरदृष्टीतून कोपरगाव शहरातील निवारा भागात नवीन वसाहत निर्माण केली. नियोजनबद्ध रचना करून निवारा परिसर विकसित केला. लोकांचे राहणीमान कसे असावे, यावर विशेष लक्ष दिले. त्यांच्या मदतीला या भागातील दोन्ही नगरसेवक आहेत.   

साई निवारा मित्रमंडळाच्या वतीने माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी नवरात्रोत्सवात विविध गुणदर्शन स्पर्धा, उखाणे स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, दांडिया स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, नृत्य स्पर्धा, होम मिनिस्टर-खेळ मानाच्या पैठणीचा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. महिला व मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा व उपक्रम राबविल्याबद्दल कोल्हे यांनी सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच या स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या सर्व स्पर्धकांचे त्यांनी कौतुक केले.