आंदोलनामुळे बस सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांची गैरसोय

शेवगाव प्रतिनिधी, दि.३० : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा भूषण मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या बेमुदत आंदोलनाच्या समर्थनात राज्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाची झळ राज्यमार्ग परिवहन महामंडळाला मोठ्या प्रमाणात बसली असून शेवगाव आगारा सह येथून जाणाऱ्या अन्य आगाराच्या मराठवाड्याकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस शनिवारी रात्रीपासून बंद झाल्या आहेत. तर आज सोमवारी नेवासा मार्गावरील देखील बस सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करण्याची वेळ आली.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शेवगाव आगारातून मराठवाडयात पैठण, गेवराई, संभाजीनगर आदि ठिकाणी दररोज नियमित सुटणाऱ्या १२ च्यावर एसटीच्या फेर्‍या तसेच राज्याच्या अन्य आगारातून शेवगाव मार्गे मराठवाड्यात संभाजीनगर, बीड, माजलगाव, अंबड, परभणी, नांदेड, जालना, पाथरी आदि ठिकाणी नियमित धावणाऱ्या सर्व बसेस देखील बंद करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे.

सध्या शेवगाव बस स्थानकातून फक्त अहमदनगर व पाथर्डी रस्त्यावरील वाहतूक सुरू असून बालमटाकळी पर्यंत बस सेवा प्रवाशांच्या उपलब्धतेनुसार सुरू असल्याची माहिती आगार व्यवस्थापक अमोल फंड, वाहतूक निरीक्षक ऋषिकेश सोनवणे यांनी दिली. दरम्यान तालुक्याच्या ग्रामीण परिसरात अनेक ठिकाणी बससेवा विस्कळीत झाल्याचा फटका शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बसला असून सध्या परीक्षा सुरु असल्याने त्यांना नाईलाजाने अव्वाच्या सव्वा पैसे मोजून खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे.

विविध मार्गावरील वाहतूक व्यवस्था बंद असल्याची माहिती प्रवाशांना नसल्याने त्यांची ससेहोलपट होत आहे. दरम्यान तालुक्यातील मुंगी ग्रामस्थांनी, आमच्या रस्त्यावर बस सोडू नका, अशी विनंती व मागणी शेवगाव आगार प्रमुखांकडे केली. त्या मार्गावरील बस सेवा ही बंद करण्यात आली आहे.