बांधकाम कामगारांना गृहोपयोगी व बांधकाम साहित्याचे वाटप
कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ : महायुती शासन अनेक लोककल्याणकारी योजना राबवत असून सर्वच घटकांचा विचार करणाऱ्या महायुती शासनाला सर्वांचीच काळजी आहे. या महायुती शासनाचा घटक म्हणून शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ पात्र गरजू लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी आजवर प्रयत्न केले असून यापुढे देखील समाजिक बांधिलकी जपण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव येथील कृष्णाई बॅक्वेट हॉल येथे आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सम्राट असंघटित कामगार संघटना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोपरगाव यांच्या वतीने कोपरगाव मतदार संघातील इमारत बांधकाम कामगारांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबीर, तसेच जिल्ह्यातील इमारत बांधकाम कामगारांना वेळेत उपचार मिळावे यासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण, तसेच नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच व बांधकाम साहित्याचे कीटचे मोफत वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,महायुती शासन राज्यातील सर्वच घटकांचा विचार करणारे शासन आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीतून सुरु करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील तमाम माता भगिनींना आर्थिक दृष्ट्या काही अंशी स्वावलंबी करणारी आहे. तसेच नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मोफत गृहोपयोगी व बांधकाम साहित्य कीट, विश्वकर्मा कारागीर योजना, युवा कौशल्य प्रशिक्षण विद्या वेतन योजना, वृद्धांसाठी मोफत तीर्थक्षेत्र योजना शेतकऱ्यांना मोफत वीज अशा विविध योजना महायुती शासन राबवीत आहे.
या योजनांचा समाजातील पात्र गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणे हे माझे कर्तव्य व माझी सामाजिक बांधिलकी देखील आहे. या जाणीवेतून माता भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कोपरगाव शहरासह गावागावात सहाय्यता केंद्र सुरु केल्यामुळे माता भगिनींच्या अडचणी कमी झाल्या. त्याप्रमाणेच सर्वच बांधकाम कामगारांना गृहोपयोगी व बांधकाम साहित्याचे कीट मिळावे यासाठी ज्या कामगारांची बायोमेट्रिक नोंदणी नाही अशा मतदार संघातील कामगारांची बायोमेट्रिक नोंदणी करून घेतली आहे.
यामागे उद्देश एवढाच की, साहित्य वाटप योजना प्रभावीपणे राबविली जाऊन एकही पात्र लाभार्थी अशा कल्याणकारी योजनांपासून वंचित राहू नये. त्यामुळे निश्चितपणे कामगारांचा आर्थिक खर्च वाचणार आहे. त्यामुळे अशा कल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले. यावेळी त्यांच्या हस्ते एकून २३६ बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच व सुरक्षा कीट देण्यात आले व शासनाकडून देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण देखील करण्यात आले. यावेळी सम्राट असंघटित कामगार संघटनेचे सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.