शेवगाव प्रतिनिधी, दि. ६ : शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने तालुक्याती ल कामगार महिलांनी आपल्या विविध मागण्यासाठी सोमवारी दुपारी येथील तहसील कार्यालयावर संघर्ष मोर्चा काढण्यात आला. राज्य शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र विधाते यांचे नेतृत्वाखाली या संघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राज्य संघटनेचे समन्वयक सुभाष सोनवणे, कैलास पवार, उत्तम गायकवाड, तालुका अध्यक्ष शिवकन्या गिरम, उपाध्यक्ष सिंधुताई भुसारे, तालुका सचिव सुनिता कापसे, जिल्हा उपाध्यक्ष छाया भूमकर तसेच तालुक्यातील शालेय पोषण आहार संघटनेच्या महिला कामगार मोर्चासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
श्रमिक मजदूर संघ संघटनेमुळे शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने येथे निघालेला हा पहिलाच मोर्चा होता. संपूर्ण महिनाभर अवध्या अडीच हजारात राबणाऱ्या या दूर्लक्षित महिलांचा प्रश्न संयोजकाने पोटतिडकीने मांडल्या बद्दल अनेक महिलांनी यावेळी धन्यवाद दिले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाचा प्रारंभ होऊन तो प्रचंड घोषणाबाजी करीत पाथर्डी रस्त्यावरील तहसील कार्यालयावर धडकला. तेथे झालेल्या सभेत विधाते सोनवणे आदी वक्त्यांनी मोर्चाचा उद्देश समजावून सांगितला.
यावेळी तहसीलदार प्रशांत सांगडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यामार्फत आहार वाटप केला जातो. हे करत असताना कर्मचाऱ्यांना अवध्या महिना अडीच हजार रुपये पगारावर अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. तरी केंद्र सरकारच्या किमान वेतनकायद्याप्रमाणे या कामगारांना किमान वेतन रुपये १५००० मिळावेत.
तसेच शासन नियमाप्रमाणे शासकीय सेवेत सामावून घ्यावे. ज्या शाळेमध्ये आहार शिजवण्याचे भांडे कमकुवत झाले आहे, तेथे नवीन भांडी द्यावीत इतर केडर प्रमाणे स्वयंपाकी व मदतनीस यांना २० लाखाचे विमा संरक्षण मिळावे. गणवेश मिळावा, कोणत्याही कर्मचाऱ्याला विनाकारण कामावरून काढण्यात येऊ नये, स्टॅम्प करारनामा रद्द करण्यात यावा. या मागण्यांचा समावेश आहे.