स्पर्धात्मक परिक्षांसाठी वाचनालये मार्गदर्शकाच्या भूमिकेत – शिंदे 

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ९ : कोरोना महामारीत संपूर्ण जग लाकडाऊन झाले होते, अशावेळी स्पर्धात्मक परिक्षांसाठी वाचनालये मार्गदर्शकाची भुमिका बजावली तेंव्हा तरुणांनी समाजमाध्यमांवर- अभासी तंत्रज्ञानावर वेळ खर्च करण्यापेक्षा नियमीत वाचनालयाची सवय ठेवावी असे प्रतिपादन नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस निरीक्षक म्हणून निवड झालेला तिळवणी येथील शेतकऱ्याचा मुलगा ज्ञानेश्वर तुकाराम शिंदे यांनी केले. 

  तालुक्यातील तिळवणी येथील सद्‌गुरु संत गाडगेबाबा ग्रंथालयाच्यावतीने ज्ञानेश्वर शिंदे व सी.ए. परिक्षा उत्तीर्ण झालेले अनिल बाळासाहेब शिंदे यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे संस्थापक विष्णुपंत रंगनाथ वाघ होते. 

प्रारंभी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण पंडोरे यांनी प्रास्ताविक केले. कोपरगाव नगरपालिका वाचनालयाचे ग्रंथपाल महेश थोरात यांनी ग्रंथ हे आपले गुरु असून त्यातून ज्ञानाचा साठा उपलब्ध होतो, लोकसेवा आयोगासह सर्व स्पर्धात्मक परीक्षेसाठी पालिका वाचनालयात समता स्टडीसह दर्जेदार पुस्तके विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिली जातात असे ते म्हणाले.

  ज्ञानेश्वर शिंदे पुढे म्हणाले की, तरुणांनी मनांमध्ये जिद्द ठेऊन प्रत्येक अभ्यासक्रमाचा मन लावून अभ्यास करावा, त्यात यश हमखास मिळते. वाचानलये समृद्धीचा पाया आहे त्यात अनेक बाबींचे  ज्ञान मिळते., सद्गुरु गंगागीर महाराज महाविद्यालयातून आपण एम. एस्ससीचे शिक्षण घेऊन स्पर्धात्मक परीक्षेची तयारी केली.

  गवंडी काम करणारे बाळासाहेब शिंदे यांचे चिरंजीव अनिल हे अवघड सी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाले, त्यांनी आता वैजापूर, कोपरगाव येथील मुलांना सी.ए मार्गदर्शनाचे काम सुरू केले आहे व ज्ञानेश्वर शिंदे हे पोलीस उपनिरीक्षक झाले हा तिळवणी गावचा नावलौकिक असल्याचे विष्णुपंत वाघ यांनी अध्यक्षपदाहून बोलताना सांगितले. 

   याप्रसंगी बंडू राठोड सर, अशोक राहणे सर, विवेक तळपे सर, रावसाहेब लहारे सर, सुशांत घोडके, अनिल शेळके, तुकाराम शिंदे, बाळासाहेब शिंदे, अंगणवाडी सेविका आशा वाघ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ग्रंथपाल निलेश वाघ यांनी मानले.

तिळवणी गावात वाचनालय असावे यासाठी तत्कालीन विधान परिषदेचे सभापती स्वर्गीय प्राध्यापक ना.स. फरांदे यांनी तीस वर्षांपूर्वी १९९४ मध्ये पाच लाख रुपयांचा निधी देऊन गाडगेबाबा ग्रंथालयाची पायाभरणी केली, त्यातून माझा मुलगा अनंत हा दिल्लीत ग्रंथालय विभागाकडे मोठा अधिकारी झाला, आणि ज्ञानेश्वर व अनिल शिंदे यांनी तो वारसा पुढे चालू ठेवला आहे ही आनंददायी बाब आहे. यू.पी.एस.सी- एम.पी एस.सी परीक्षेसाठी येथे सर्व पुस्तके मोफत उपलब्ध करून दिली जातात असे भावनिक उद्गार विष्णुपंत वाघ यांनी काढले.