शेवगाव प्रतिनिधी, दि. १२ : दिव्यांगत्वाच्या संकटाचा मुकाबला करणाऱ्यां दिव्यांगाच्या उन्नतीसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजू पर्यंत पोहचविण्यासाठी शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने त्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने आपले कार्यालय कटीबध्द असल्याची ग्वाही तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिली.
महसूल पंधरवाडा अंतर्गत ” एक हात मदतीचा, दिव्यांगाच्या कल्याणाचा ” या उपक्रमान्तर्गत येथील तहसील कार्यालयात सोमवारी पार पडलेल्या दिव्यांगाच्या विशेष बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रलंबित राहिलेल्या दिव्यांगांची मतदार नोंदणी व दुरुस्ती, अंत्योदय -रेशनकार्ड, घरकुल, निराधार योजनांचा लाभ, ग्रामपंचायत स्तरावरील पाच टक्के निधी खर्च, शासन ओळख पत्राचे वाटप, आधार कार्ड दुरुस्ती आदि शासकीय सवलतीच्या – योजनांचा आढावा घेण्यात येऊन काही तक्रारींचा जागेवर निपटारा करण्यात आला.
मंडल कृषी अधिकारी प्रशांत टेकाळे यांच्या अध्यक्षते खाली पार पडलेल्या दिव्यांग सहविचार सभेत निवासी नायब तहसीलदार दिपक कारखिले निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार राजेंद्र बकरे, परिक्षाविधीन नायब तहसीलदार गौरी कट्टे, श्रीकान्त गोरे, शशिकान्त देऊळगावकर, अशोक रुईकर आदिची प्रमुख उपस्थिती होती.
प्रहार दिव्यांग संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा लक्ष्मी देशमुख, जिल्हा संघटक गणेश हानवते, सावली दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष चांद शेख, शहराध्यक्ष गणेश महाजन, लक्ष्मण अभंग, लहुराव भवर, बाबामिया सय्यद, बाबासाहेब कणसे, सुजाता बडे आदिनी चर्चेत सहभाग घेतला. संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार निलेश वाघमारे यांनी सुत्रसंचलन केले.