शेवगाव प्रतिनिधी, दि. १३ : मोठ्या परताव्याचे अमिष दाखवून अनेकांना कोट्यावधी रुपयांना गंडा घालणाऱ्या युवकाला, शेवगाव पोलिसांनी गंगापूर ( छ. संभाजीनगर ) येथून ताब्यात घेऊन अटक केली. येवला रस्त्यावरील एका हॉटेल मध्ये त्याच्या मित्रांच्या समवेत पार्टी मध्ये रमला असताना, पोलिसांनी सापळा रचून त्यास चतुर्भूज केले.
फिर्यादी बबन अण्णासाहेब शिरसाठ (रा.नविन खांमपिंप्री) यांनी त्यांच्यासह इतर साथीदारांची सुमारे दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी, गणेश बाळासाहेब उर्फ बाळकृष्ण कुलट (रा.आंतरवली खु. ) याचे विरोधात १२ ऑगस्ट रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपसाची चक्रे फिरवली.
सदर युवक गंगापूर – येवला मार्गावरील हॉटेल मध्ये त्याच्या मित्रांच्या समवेत पार्टी करीत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाल्या नंतर शेवगाव पोलिस पथक संबंधित स्थळी रवाना झाले. यावेळी गणेश हा नशेत तर्र होऊन बिर्याणीवर ताव मारीत असताना पोलिसांनी सापळा रचून त्यास अटक केली आहे.
अन्य आरोपींना तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने लवकरात लवकर अटक करण्यात येणार आहे. फरार आरोपींच्या मागावर पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. याआरोपी कडून फसवणुक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोलीस स्टेशनला बिनधास्तपणे संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागिय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, पोलीस कर्मचारी परशुराम नाकाडे, शाम गुंजाळ, संतोष वाघ, बाप्पासाहेब धाकतोडे, संपत खेडकर, राहुल खेडकर यांच्यासह नगर दक्षिण सायबर सेलचे राहुल गुड्डु यांनी केली आहे. पुढील तपास धरमसिंग सुंदरडे करत आहेत.