कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : शहरातील मुख्य चौकात महिला व पुरुषासाठी स्वच्छता गृह बांधावे या मागणीसाठी सर्व सामान्य नागरिक व बाजार पेठेतील व्यापारी यांच्या समवेत लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने नगरपालिका आवारात प्रतिकात्मक सामूहिक मूत्र विसर्जन आंदोलन करण्यात आले, अशी माहिती लोक स्वराज्य आंदोलनाचे अँड.नितीन पोळ यांनी एका निवेदनाद्वारे नगर पालिकेला केली
आपल्या निवेदनात पोळ पुढे म्हणाले की, कोपरगाव शहरात मूख्य रस्त्या लगत पुरुषांसाठी स्वच्छता गृहे होती. मात्र विकास कामाच्या गदारोळात ही स्वच्छता गृहे नगरपालिकेने काढून टाकले तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्य गृहाच्या बाजूला असलेले स्वच्छता गृहा शेजारी नवीन इमारतीचा पाया खोदत असताना आठ दिवसापूर्वी पडले. मात्र त्यामुळे परिसरातील नागरिक व व्यापारी यांची मोठी हाल होत आहे तसेच महिला करिता एवढ्या मोठ्या शहरात भाजी मार्केट मध्ये एकमेव स्वच्छता गृह आहे.
अनेक व्यापारी व नागरिक यांनी वारंवार नगरपालिकेकडे स्वच्छता गृहाची मागणी केली. मात्र आठ दिवस झाले तरी नागरिक, व्यापारी यांच्या मागणीकडे नगरपालिका अक्षम्य दुर्लक्ष करत असून आज रोजी कोपरगाव शहरातही महिला व पुरुषांना लघवी करण्यासाठी स्वच्छता गृह त्वरित बांधावे या मागणीसाठी कोपरगाव शहरातील नागरिकांच्या वतीने नगरपालिका आवारात प्रतिकात्मक सामूहिक मूत्र विसर्जन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.
या आंदोलनात आंदोलक प्लास्टिक बाटली घेऊन त्यात प्रतिकात्मक मूत्र घेऊन नगर पालिका आवारात गेले सदरचे निवेदन उपमुख्य अधिकारी चाकने साहेब यांना देण्यात आले.
या आंदोलनास शिवसेनेचे भरत मोरे, महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे संतोष गंगवाल, शेतकरी कृती समितीचे तुषार विध्वंस, उमेश धुमाळ, भूमीपुत्र फाउंडेशनचे निसार शेख, भोई समाज संघटनेचे अर्जुन मोरे, शफीक सय्यद, काँग्रेसचे नितीन शिंदे, गिरीधर पवार, सुनील दवंगे, अफजल मौलाना, चंद्रशेखर आढाव, अमित खोकले, व्यापारी बांधव तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.