शेवगाव प्रतिनिधी, दि. १९ : विविध उपक्रम राबविल्याने प्रसिद्धी झोतात आलेल्या तालुक्यातील वाघोली ग्रामस्थांच्या वतीने नुकताच एमपीएससी अंतर्गत यशश्वी होऊन नियुक्ती झालेल्या पंचक्रोशितील पदाधिकाऱ्यांचा नागरी सन्मान सोहळा पार पडला.
यावेळी प्रसाद कराळे, आदिनाथ कदम, भूषण पिसे, स्नेहल खंडागळे या पोलिस उपनिरीक्षकांचा तसेच मुंबई पोलीस सतीश बडे, जालना पोलीस सचिन चेके यांचा यथोचित सन्मान करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
सत्कार मुर्तींनी आम्ही कसे घडलो, परीक्षेची तयारी कशी केली. हा खडतर प्रवास शब्दबध्द करताना त्यांच्या भावना दाटून आल्या होत्या. त्यांनी आपल्याला आलेल्या अनुभवातून उपस्थित विद्यार्थी व पालकांना स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन केले.
या सन्मान सोहळ्याचे औचित्य साधून यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वाघोलीतील तरुण वर्गाने तसेच मंखळराव पांढरे व उमेशभाऊ मित्र परिवार दिंडेवाडी चव्हाणवाडी येथील २५ सक्तदात्यानी रक्तदान करून चांगला प्रतिसाद दिला. यावेळी ‘हर घर तिरंगा हर घर पौधा’ हा उपक्रम राबवत दोन हजार वृक्ष वाटप करण्यात आले.
सोहळ्याचे अध्यक्षस्थानी दादासाहेब जगदाळे होते, ग्रामसेविका जनाबाई फटाले, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच उपसरपंच, तंटा मुक्ती अध्यक्ष सुभाष दातिर, गावातील तरुण वर्ग व वडीलधारी मंडळी, त्याचबरोबर वाघोली, निंबे नांदूर, कामत शिंगवे, जोड मोहोज, मंगरूळ, दहिगाव, माका, वडूले, दिंडेवाडी, चव्हाणवाडी, ढोरजळगाव येथील ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. आदर्श गाव वाघोलीचे प्रणेते उमेश भालसिंग यांनी प्रास्ताविक करून शुभेच्छा दिल्या. सोमेश्वर शेळके यांनी सुत्र संचलन केले. राजेंद्र जमधडे यांनी आभार मानले.