शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : रोजच्या नियमित कामाच्या रगाड्यातून महिला वर्गाला थोडी उसंत मिळावी. त्यांच्या कलागुणांना प्रदर्शित करण्याची संधी मिळावी या उद्देशाने येथील स्व. राजीव राजळे मित्र मंडळाने गणेशोत्सवाचे औचित्य साधत आयोजित केलेल्या “न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा ” हा महिलांसाठीच्या कार्यक्रमास अबाल वृद्ध महिलानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी जवळपास तीन साडेतीन हजार महिलांनी सहभाग नोंदवत बक्षिसाची लयलूट केली. यावेळी या कार्यक्रमात वैशाली ओंकार झाडे यांनी प्रथम क्रमांक पटकावत व्हर्लपूल फ्रिज व मानाची पैठणी, प्रज्ञा सचिन डुकरे यांनी द्वितीय क्रमाकाचे सॅमसंग वॉशिंग मशीन व मानाची पैठणी, तर तृतीय क्रमांक प्रतीक्षा दिगंबर भवार यांनी एलईडी ३२ इंची टीव्ही व मानाची पैठणी पटकावली.
तसेच ५० उत्कृष्ट सहभागी खेळाडूंना आकर्षक पैठण्या भेट देण्यात आल्या. याशिवाय प्रश्नमंजुषा बक्षीस चांदीचे नाणे व नोंदणीकृत दहा महिलांसाठी लकी ड्रॉ पद्धतीने पैठण्या भेट देऊन बक्षिसाची लयलुट करण्यात आली.
शेवगांव मध्ये प्रथमच अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात नव युवतींपासुन ८१ वर्षाच्या आजी पर्यंतच्या अनेक महिलांनी कार्यक्रमात भाग घेऊन आगळा वेगळा आनंद लुटला. या कार्यक्रमा निमित्त सिने अभिनेता क्रांती नाना माळेगावकर तसेच बालगायिका टीव्ही स्टार सह्याद्री माळेगावकर यांनी स्वतः उपस्थित राहून कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन केले.
यावेळी आमदार मोनिकाताई राजळे यांनी आमच्या महिला भगिनी दिवसरात्र संसाराच्या कामात, मुलाबाळांच्या देखरेखीत नेहमीच व्यस्त असतात. माता – भगिनींना या सर्व व्यापातून बाहेर काढण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्व. आ. राजीव राजळे मित्र मंडळाने आयोजित केलेल्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाबद्दल व उत्कृष्ठ नियोजना बद्दल संयोजकाना धन्यवाद देत त्यात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिलांचे कौतुक केले. कार्यक्रमासाठी भाजपा महिला पदाधिकारी व शेवगांव शहर व ग्रामीण भागातील महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.