कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढतांना आ. आशुतोष काळे यांनी बहुतांश रस्त्यांचा प्रश्न सोडविला आहे. व उर्वरित सर्वच रस्त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु असून त्या पाठपुराव्यातून मतदार संघातील चार रस्त्यांना जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२३-२४ मध्ये लेखाशीर्ष ५०५४ इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरण अंतर्गत ८० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
चार वर्षापूर्वी कोपरगाव मतदार संघातील रस्ते हे नागरिकांसाठी मोठे डोकेदुखी होती. त्यामुळे मतदार संघाच्या विकासाला देखील खीळ बसली होती. सर्व प्रमुख रस्ते, जिल्हा मार्ग अनेक गावांतर्गत रस्त्यांची झालेली दुर्दशा त्यामुळे रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती झाली होती. त्यामुळे हा रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढतांना आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघाच्या रस्त्यांना आजपर्यंत जवळपास ४४० कोटीचा निधी आणून या रस्त्यांचे रुपडे पालटविले आहे.
त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी होवून विकासाला देखील चालना मिळाली आहे. तरीदेखील मतदार संघातील सर्वच रस्त्यांना निधी मिळावा यासाठी शासनदरबारी प्रस्ताव सादर करून त्याबाबत त्यांचा पाठपुरावा सुरूच असतो. त्या पाठपुराव्यातून महायुती शासनाने मतदार संघातील उक्कडगाव ते घोयेगाव, धारणगाव ते ब्राह्मणगाव चौफुली, बहादराबाद ते वेस आणि तळेगाव मळे ते उक्कडगाव या चार रस्त्यांसाठी प्रत्येकी २० लक्ष रुपये याप्रमाणे एकूण ८० लक्ष रुपये निधी मंजूर केला आहे.
मागील अनेक वर्षापासून रस्त्यांच्या अडचणीमुळे त्रस्त असणाऱ्या नागरिकांची अडचण आ. आशुतोष काळे यांनी सोडविल्यामुळे उक्कडगाव, घोयेगाव, धारणगाव,ब्राह्मणगाव, बहादराबाद, वेस, तळेगाव मळे व उक्कडगाव या नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. रस्त्याच्या अडचणीमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची व सातत्याने करीत असलेल्या पाठपुराव्याची दखल घेवून ८० लक्ष निधी मंजूर केल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितपवार, महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहे.